
सातारा,
जागतिक वनदिनानिमित्त सातारा वनविभागाच्या वतीने उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत वनविभागाने एक आदर्श उपक्रम राबविल्याचे पाहायला मिळाले.

वनसंवर्धनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत वनविभाग, सातारा नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक वनदिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि रक्तदान करून समाजातील गरजू रुग्णांना मदत करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास उपवनसंरक्षक, सातारा श्री. अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौंधळ, सहाय्यक वनसंरक्षक श्री. दिगंबर जाधव, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा श्री. संदीप जोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या शिबिरात माऊली ब्लड सेंटर, सातारा चे अध्यक्ष डॉ. गिरीश पेंढारकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रमण भदड यांच्यासह वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी वनपाल, वनरक्षक, वनविभागातील कर्मचारी तसेच डेटा ऑपरेटर यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

या रक्तदान शिबिरात सातारा, मेढा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, कराड, पाटण आणि कोरेगाव या वनक्षेत्रांतील एकूण ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार असून, समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होण्यासही मोठा हातभार लागणार आहे.

वनविभागाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, वनसंवर्धनासोबत समाजसेवेची जाण जपणारा हा उपक्रम इतर शासकीय विभागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वनविभाग, सातारा यांच्या वतीने करण्यात आले असून, भविष्यातही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 🌿👏



