सभापती होताच सौरभ शिंदे यांचा सर्वसामान्यांसाठी पहिलाच दिलासा; कुडाळ आधार केंद्र पुन्हा सुरू

पहिल्याच निर्णयात सौरभ शिंदे यांची दमदार कामगिरी; कुडाळ आधार केंद्र पुन्हा सुरू
जावळी तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी घटना घडली असून, जावळी पंचायत समितीचे सभापती म्हणून पदभार स्वीकारताच सौरभ शिंदे यांनी पहिल्याच निर्णयात विधायक काम करत कुडाळ येथील बंद असलेले आधार सेवा केंद्र पुन्हा सुरू करून दाखवले आहे.
गेल्या तब्बल १४ महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे कुडाळचे शासकीय आधार केंद्र बंद होते. यामुळे जावळी तालुक्यातील नागरिकांना आधार कार्डसंबंधित कामांसाठी सातारा, वाई यांसारख्या इतर तालुक्यांमध्ये जावे लागत होते. या पायपीटीमुळे नागरिकांना वेळ आणि खर्च या दोन्हींचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
मात्र, माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील DIT विभाग व MAHA IT विभागाच्या सहकार्याने हे केंद्र पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख यामधील दुरुस्ती करणे तसेच हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवणे अशा सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या आहेत.
कुडाळ येथील आधार केंद्र चालक राहुल बावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असून, आता तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच सौरभ शिंदे यांनी केलेल्या या पहिल्याच निर्णयामुळे त्यांच्या कामकाजाची झलक पाहायला मिळाली असून, नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!