
मेढा / जावळी तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौरभ राजेंद्र शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा दाखवत सभापती पदावर विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी कुशल राजकीय डावपेच आखत बाजी मारली असून त्यांच्या विजयामुळे जावळी तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून जावळी पंचायत समितीचा सभापती कोण होणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी सौरभ शिंदे यांनी आपल्या खास राजकीय शैलीत शेवटच्या क्षणी बाजी पलटवत क्रिकेटमधील षटकाराप्रमाणे विजय मिळवत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवला.

या विजयामागे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendrasinhraje Bhosale यांच्या नेतृत्वाची आणि राजकीय ताकदीची मोठी चर्चा होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने सभापती पदासह उपसभापती पदावरही विजय मिळवला. उपसभापतीपदी महाडिक यांची निवड झाली.
निवडणुकीत सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली, तर विरोधी उमेदवार शिवसेनेच्या कविता जोंधळे यांना दोन मतांवर समाधान मानावे लागले. प्रारंभी ही निवडणूक ईश्वर चिठ्ठीवर जाईल का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या हुमगाव गणातून निवडून आलेल्या शिल्पा मिलिंद शिंदे यांनी मतदानावेळी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे राजकीय समीकरणे अचानक बदलली.
त्यामुळे भाजपच्या तीन मतांसह सभापती पदाचे एक मत मिळून एकूण चार मतांची बेरीज सौरभ शिंदे यांच्या पदरात पडली आणि त्यांचा विजय निश्चित झाला. शिल्पा शिंदे यांच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका का घेतली, यामागे नेमकी कोणती राजकीय कारणे आहेत, याबाबत तालुक्यात विविध तर्कवितर्क लावले जात असून जावळी तालुक्याच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



