
कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला अखेर सुरुवात; अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
कुडाळ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आज अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राच्या इमारतीच्या कामाला अखेर प्रत्यक्षात सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले असून आज इमारतीवरील स्लॅब भरण्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक आणि युवा यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

कुडाळसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विरंगुळा केंद्र एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. आयुष्यभर कष्ट करून समाज घडवणाऱ्या ज्येष्ठांना निवांत वेळ घालवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि विविध उपक्रमांसाठी एक स्वतंत्र जागा उपलब्ध होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीचे काम सुरू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता.
या इमारतीचे काम काही वर्षांपासून लालफितीच्या अडचणींमध्ये अडकले होते. अनेकदा प्रयत्न करूनही प्रत्यक्ष काम सुरू होत नव्हते. मात्र मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून या कामाला गती मिळाली आणि अखेर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. या कामासाठी माजी सरपंच वीरेंद्र शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आज हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला.
विरंगुळा केंद्राच्या पायाभरणीच्या आठवणींनाही आज उजाळा मिळाला. ज्येष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी मनोज वंजारी आप्पा यांची आठवण उपस्थितांना भावूक करून गेली. त्यांच्या योगदानामुळेच या केंद्राची संकल्पना पुढे आली होती, असे अनेकांनी सांगितले. आज इमारतीचे काम सुरू होताना त्यांची आठवण काढत अनेकांनी कृतज्ञतेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमावेळी भाऊराव अण्णा शेवते, चंद्रसेन शिंदे, अजिजभाई मुजावर, भिकू राक्षे, विलास कांबळे, विरेंद्र शिंदे, आशिष रासकर, ज्ञानेश्वर कुंभार, उत्तम देवकर, जयसिंगराव शिंदे, ननावरे बापू, अरुण किरवे, सोमनाथ कदम, महेश पवार, महेश बारटक्के, अजित शिराळकर, हनुमंतराव शिंदे, बाळकृष्ण राक्षे, बाळासाहेब वारागडे, देवराम चौधरी, नथू दादा कदम, रावसो कुंभार, सुदाम रासकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच या विरंगुळा केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन कुडाळ आणि पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुसज्ज आणि आत्मीयतेने भरलेले केंद्र उभे राहणार आहे. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपून आज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यामुळे हा दिवस कुडाळच्या इतिहासात ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा आणि भावनिक ठरणारा ठरला आहे.



