सातारा वनविभागाची डॅशिंग कारवाई; गुप्त माहितीनंतर चार गावांत धाड, तस्करांचे धाबे दणाणले वनविभागाने २५ लाखांचा साठा जप्त

सातारा वनविभागाची डॅशिंग कारवाई; अवैध साग-रायवळ लाकूड साठ्यावर धाड, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
सातारा : प्रतिनिधी
सातारा वनविभागाने अवैध लाकूड तस्करीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत उंब्रज परिसरात लाखो रुपयांचा साग व रायवळ प्रजातीचा लाकूडमाल जप्त केला आहे. दोन दिवस चाललेल्या संयुक्त धाडीत तब्बल १२८३ अनगड नगांसह मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूडही जप्त करण्यात आल्याने लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
वनविभागाच्या दक्षता पथकाला उंब्रज (ता. कराड, जि. सातारा) व परिसरातील काही गावांमध्ये कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणात साग आणि रायवळ प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करून त्याचा साठा केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा व वनपरिक्षेत्र अधिकारी कराड यांच्या पथकाने ७ आणि ८ मार्च रोजी उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे आणि कोर्टी या चार ठिकाणी अचानक धाड टाकली.


या कारवाईदरम्यान तब्बल ९८.४४९ घनमीटर एवढा १२८३ नगांचा साग व रायवळ प्रजातीचा लाकूडसाठा जप्त करण्यात आला. या अनगड लाकूडमालाची किंमत सुमारे २५ लाख २७ हजार ८७२ रुपये इतकी असल्याचे वनविभागाने सांगितले. याशिवाय कळंत्रेवाडी आणि शिवडे येथून ६१.२७५ घनमीटर जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ७९ हजार १०३ रुपये इतकी आहे.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत चार ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले असून तीन गुन्हे वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांनी तर एक गुन्हा वनपरिक्षेत्र अधिकारी कराड यांनी दाखल केला आहे. जप्त केलेला लाकूडसाठा नेमका कुठून आणण्यात आला आणि तो पुढे कुठे पाठवला जाणार होता याचा सखोल तपास सध्या वनपरिक्षेत्र अधिकारी कराड करत आहेत.
ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धाडीत वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील तसेच वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, अवैध वृक्षतोड व त्याची वाहतूक करणे हा गंभीर वनगुन्हा असून भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार एक वर्षापर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशारा वनविभागाने दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या वनगुन्ह्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!