
वनवा लावणाऱ्याला कोर्टाचा दणका! सातारा वनविभागाच्या कारवाईने निसर्गद्रोह्यांच्या छातीत धडकी
सातारा( प्रतिनिधी )सातारा जिल्ह्यातील डोंगररांगांमध्ये वनवा लावून निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी करणाऱ्यांविरोधात आता वनविभागाने कठोर भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील कारवट-घेरादातेगड परिसरात वनवा लावणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दणका देत दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे वनवा लावणाऱ्या प्रवृत्तींमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२५ रोजी वनकर्मचारी नियतक्षेत्रात गस्त घालत असताना कारवट येथील घेरादातेगड वनपरिक्षेत्रातील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांक ४५४ मध्ये संशयास्पद हालचाल आढळून आली. तपास करत असताना एका व्यक्तीला प्रत्यक्ष वनवा लावताना वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. तात्काळ कारवाई करत वनविभागाने आरोपी आनंदा गंगाराम बोडके याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम २६(१) अन्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी वनविभागाने आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून न्यायालयात खटला दाखल केला होता. जवळपास वर्षभर चाललेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर दिनांक ९ मार्च २०२६ रोजी माननीय न्यायालयाने निकाल देत आरोपीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
वनविभागाने या प्रकरणात अत्यंत काटेकोरपणे पाठपुरावा केला. विशेषतः पाटणचे वनपाल निलेश कुंभार यांनी या गुन्ह्याची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेत विशेष लक्ष घालत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच अखेर आरोपीला न्यायालयीन दणका बसल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण कारवाईदरम्यान सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव तसेच वनक्षेत्रपाल नलवडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. प्रत्यक्ष कारवाईत वनरक्षक रोहित लोहार, विलास वाघमारे, राम मोटे, अयोध्या रन्हेर, मेघराज नवले आणि इतर सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
सध्या सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागात काही अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतींमुळे मुद्दाम वनवा लावण्याच्या घटना वाढल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. परंतु अशा निसर्गविघातक कृत्यांविरोधात आता वनविभागाने करडी नजर ठेवली असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे.
वनविभागाच्या या कठोर कारवाईमुळे वनवा लावणाऱ्या आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली निसर्गाशी खेळ करणाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “निसर्गाशी छेडछाड करणाऱ्यांना आता कुठलीही सवलत दिली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.
निसर्गरक्षणासाठी सुरू झालेल्या या मोहिमेमुळे भविष्यात वनवा लावण्याच्या घटनांवर आळा बसेल आणि निसर्गद्रोह्यांना अद्दल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सातारा वनविभागाने सुरू केलेला हा धडाका पुढेही कायम राहणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.



