“राजकारणात त्यागाची किंमत आहे का? दत्ता गावडे यांना न्याय देण्याची वेळ

कुडाळ(प्रतिनिधी) राजकीय त्यागाची पोहोचपावती कधी? दत्ता गावडे यांना जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदाची मागणी जोर धरते
जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगू लागली आहे—जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता गावडे यांना त्यांच्या राजकीय त्यागाची योग्य दखल म्हणून जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्यपद देऊन न्याय मिळणार का? अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते यामुळे दत्ता गावडे हे जावळी तालुक्यात एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

त्यामुळेच त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांकडून आता त्यांना स्वीकृत सदस्यपद देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यपदासाठी दत्ता गावडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता होती. त्या वेळी राजकीय गणिते त्यांच्या बाजूने असतानाही त्यांनी आपल्या मित्र आणि सहकारी वसंतराव मानकुमरे यांना संधी मिळावी म्हणून मोठेपणा दाखवत माघार घेतली. स्वतः जिल्हा परिषदेसाठी न उभे राहता त्यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाग घेतला. त्या निवडणुकीत दत्ता गावडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत जावळी तालुक्यात नवा विक्रम प्रस्थापित केला.


नंतर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पदाचा केवळ मान राखला नाही, तर त्या पदाला वेगळेच वजन आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. उपसभापती पदावर असताना त्यांनी जावळी तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन अनेक विकासकामे राबवली. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा आणि ग्रामीण भागातील मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांच्या कार्यकाळातील अनेक निर्णय आणि कामांची आठवण जावळीतील नागरिक काढताना दिसतात.


दरम्यान, २०२६ च्या राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्यपदासाठी दत्ता गावडे यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु यावेळीही त्यांनी पुन्हा एकदा मित्रत्व आणि पक्षनिष्ठा जपत वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून स्वतः मागे हटण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः कोणत्याही निवडणुकीत न उभे राहता नव्या युवकांना संधी देण्याचा मोठेपणा दाखवला. त्यामुळे त्यांच्या राजकीय संयमाची आणि त्यागाची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.


दत्ता गावडे हे कायमस्वरूपी छत्रपती घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व ते शब्दशः प्रमाण मानतात. शिवभक्ती आणि छत्रपतींच्या विचारांप्रती असलेली त्यांची निष्ठा जावळी तालुक्यातील जनतेला चांगलीच परिचित आहे. सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मदतीचा हात देणारे दत्ता गावडे हे सामान्य माणसांच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.


जावळीतील अनेक युवक रोजगार किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईसारख्या महानगरांत जात असताना त्यांना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही दत्ता गावडे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे. त्यामुळेच अनेक युवक त्यांना आपल्या हृदयातील नेतृत्व मानतात.
अनेक वेळा राजकीय संधी समोर येऊनही त्याग करणारे दत्ता गावडे यांना आता त्यांच्या निष्ठेची आणि योगदानाची पोहोचपावती मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळाल्यास त्यांच्या दीर्घकालीन कार्याचा सन्मान होईल आणि जावळी तालुक्यातील एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळेल, अशी भावना कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
राजकारणात स्वार्थापेक्षा निष्ठा आणि त्याग यांना महत्त्व देणारे नेतृत्व आजच्या काळात दुर्मिळ मानले जाते. अशा परिस्थितीत दत्ता गावडे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळणे ही केवळ व्यक्तीची नव्हे तर जावळी तालुक्यातील जनतेच्या भावनांची दखल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!