घडलं नाही, घडवलं गेलं; कुसुंबीतील भाजप पराभवाची इनसाईड स्टोरी

(टीम AIM MEDIA)….जावळी तालुक्यातील अत्यंत राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुंबी जिल्हा परिषद गटात भाजपचा झालेला पराभव हा आकस्मिक नव्हता, भावनिक नव्हता आणि अपघाती तर मुळीच नव्हता.
तो होता तीन वेगवेगळ्या पराभवांची, तीन वेगवेगळ्या नेत्यांच्या मनात साचलेल्या सलांची आणि तीन स्वतंत्र यंत्रणांनी आखलेल्या सूडाची एकत्रित राजकीय परिणती—अशी चर्चा सध्या जावळीच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात नाही, तर ठामपणे सुरू आहे.
ही लढाई प्रचाराने जिंकलेली नव्हती.
ही लढाई आठवणींनी, अपमानांनी आणि शांत पण चाणक्य प्लॅनिंगने जिंकलेली होती.
पहिली सल : मेढा नगरपंचायत आणि अंकुश बाबा कदम
या संपूर्ण राजकीय कथानकाचा पहिला धागा जातो मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी मेढा नगरपंचायतीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली होती. मात्र या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांची यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे कार्यरत होती, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते.

निकाल अत्यंत बोचरा ठरला—
अवघ्या ४६ मतांनी नगराध्यक्ष पद शिवसेनेच्या हातातून निसटले
काही प्रभागांत शिवसेनेचे नगरसेवक अल्पमतात पडले
विजय जवळ असूनही सत्ता हुकली
हा पराभव केवळ आकड्यांचा नव्हता; तो मानसिक आणि राजकीय जखम होता.
ही सल अंकुश बाबा कदम यांच्या डोक्यात आणि हृदयात खोलवर रुजली, असे त्यावेळीच बोलले जात होते.
दुसरी चाल : “पुढचा डाव कुसुंबी”
मेढा नगरपंचायतीचा पराभव पचवताना एक गोष्ट स्पष्ट होती—
पुढची मोठी लढाई कुसुंबी जिल्हा परिषद गटातच होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अंकुश बाबा कदम यांनी थेट मैदानात उतरण्याऐवजी शिवसेनेची स्वतंत्र, वेगळी आणि शांत यंत्रणा उभी केली.

ही यंत्रणा उभी राहिली एकनाथ ओंबळे यांच्या माध्यमातून.
एकनाथ ओंबळे—शिवसेनेचे अनुभवी नेते.
त्यांच्या पत्नी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उभ्या होत्या.
म्हणजेच ही लढाई केवळ पक्षाची नव्हती, ती प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची होती.
तिसरा निर्णायक क्षण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा
कुसुंबी गटातील लढतीला निर्णायक वळण मिळालं तेव्हा, जेव्हा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः प्रचारासाठी मैदानात उतरले.
हे सहज घडलं नाही.
एकनाथ ओंबळे आणि अंकुश बाबा कदम यांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कुसुंबी गटात सभा घ्यायला लावली.

सभेत—
जावळी तालुक्यात झालेल्या विकासकामांचा पाऊस
सरकारची ताकद
आणि “ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे” हा थेट संदेश
खुद्द उपमुख्यमंत्री आपल्या उमेदवारासाठी प्रचाराला येणं, ही बाब कुसुंबी गटात अनेक मतदारांना भावली.
“ही लढाई हलक्यात घेण्यासारखी नाही” हा संदेश गावोगाव पोहोचला.
चौथी अदृश्य शक्ती : ऋषिकांत शिंदे – मिस्टर इंडिया
इथून पुढे ही लढाई उघड दिसेनाशी झाली—
पण अदृश्यपणे अधिक धारदार झाली.
शिवसेनेचे माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे या लढतीत समोर नव्हते, पण सर्वत्र होते.
राजकीय वर्तुळात त्यांना “मिस्टर इंडिया” का म्हणतात, याचं उत्तर कुसुंबीने दिलं.

बूथनिहाय हालचाली
भाजपमधील नाराज घटकांशी संवाद
जिथे जिथे भाजपचा आत्मविश्वास होता, तिथे तिथे शंका पेरणं
ही सगळी कामं शांतपणे, कुठलाही गाजावाजा न करता झाली.
पाचवी परतफेड : जिल्हा बँक आणि शशिकांत शिंदे
या सगळ्या रणनितीच्या मुळाशी होती जिल्हा बँकेतील जुनी जखम.
आमदार शशिकांत शिंदे यांचा जिल्हा बँकेतील धक्कादायक पराभव—
आणि त्या पराभवामागे ज्ञानदेव रांजणे यांची भूमिका, ही गोष्ट कुणाच्या विस्मरणात गेली नव्हती.

म्हणूनच—
शशिकांत शिंदेंची स्वतंत्र यंत्रणा
ऋषिकांत शिंदेंची अदृश्य चाल
अंकुश बाबा कदमांची रणनीती
आणि शिवसेना-राष्ट्रवादीचे एकत्रित प्लॅनिंग
हे सगळं एका लक्ष्यावर केंद्रित झालं— 👉 ज्ञानदेव रांजणे यांची यंत्रणा पोखरणं.
शेवटचा वार : आत्मविश्वासाचं नामोहरण
भाजपचा उमेदवार प्रचारात आत्मविश्वासात होता.
सत्ता, विकासकामे, यंत्रणा—सगळं त्याच्याकडे होतं.
पण— जिथे जिथे ज्ञानदेव रांजणे यांची यंत्रणा मजबूत होती,
तिथे तिथे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या मिस्टर इंडियाने छिद्र पाडलं.
निकाल आला…
आणि भाजप अवघ्या १८० मतांनी कोसळला.
निष्कर्ष : हा पराभव योगायोग नाही
कुसुंबी जिल्हा परिषद गटात जे घडलं, ते—
रागातून घडलेलं नाही
अचानक घडलेलं नाही
आणि केवळ निवडणूक नाही
तो आहे राजकीय आठवणींचा हिशोब,
अपमानांची परतफेड,
आणि अदृश्य शक्तींच्या नियोजनाचा यशस्वी प्रयोग.
आज कुसुंबी गट गेला आहे.
हा प्रश्न आता भाजपला झोप येऊ देत नाही.



