जावळीचा भाजप बालेकिल्ला ढासळला; शिंदे-शरद पवार गटाच्या संयुक्त लढ्याने राजकीय समीकरणे बदलली


इम्तियाज मुजावर | प्रतिनिधी
जावळी तालुका गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कोट्यवधींच्या विकास कामांचा गाजावाजा, मजबूत संघटनात्मक रचना, मोठ्या नेत्यांचा प्रभाव आणि प्रभावी प्रचारयंत्रणा यामुळे भाजपची पकड अभेद्य मानली जात होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या उमेदवारांनी मोठे भगदाड पाडत जावळीतील राजकीय चित्रच बदलून टाकले आहे.


या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाने दोन पंचायत समितीच्या जागा आणि एक जिल्हा परिषदेची जागा जिंकत भाजपला चारी मुंड्या चित करत ‘आसमान दाखवले’, तर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या म्हसवे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्वप्ना शिंदे यांनी भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला पराभूत करत शशिकांत शिंदे यांचा करिष्मा आजही जावळीत शिल्लक असल्याचे ठामपणे दाखवून दिले.
जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपला निसटते यश, पण धक्के मोठे
एकूण निकाल पाहता भाजपला कुडाळ जिल्हा परिषद गट जिंकता आला, मात्र कुसुंबी जिल्हा परिषद गट भाजपच्या हातातून निसटला. म्हसवे जिल्हा परिषद गटात भाजपने एक जागा आणि पंचायत समितीची एक जागा जिंकत अत्यंत निसटता विजय मिळवला.


म्हसवे जिल्हा परिषद गटात भाजपकडून वसंतराव मानकुंबरे यांनी शिवसेनेच्या संदीप पवार यांच्यावर २२२७ मतांनी विजय मिळवला. वसंतराव मानकुंबरे यांना ९८९८ मते मिळाली, तर संदीप पवार यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून ७६७१ मते मिळाली. विशेष म्हणजे संदीप पवार यांनी मिळवलेली मते भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहेत. हा विजय एकतर्फी नव्हता, हे स्पष्ट झाले.
कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय, पण अपक्षांची घसरण
कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपच्या जयश्रीताई सुहास गिरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पूनम नायकुडे यांचा ६७१५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. पूनम नायकुडे यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र भाजपच्या संघटनात्मक ताकदीसमोर त्या कमी पडल्या. या गटात अपक्ष उमेदवार जयश्री संजय शेवते यांना अवघी २३६७ मते मिळाली, त्यामुळे अपक्षांचा प्रभाव मर्यादित राहिला.
कुसुंबी गटात भाजपला जबर धक्का
या निवडणुकीतील सगळ्यात धक्कादायक निकाल कुसुंबी जिल्हा परिषद गटात लागला. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे (भाजप) यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कविता ओंबळे यांनी अवघ्या १८० मतांनी पराभव केला. कविता ओंबळे यांना ८९५१ मते मिळाली. हा निकाल भाजपसाठी अत्यंत चिंताजनक मानला जात असून पक्षाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा ठरला आहे.


खरशी-बारामुरे व म्हसवे गणात संमिश्र निकाल
म्हसवे जिल्हा परिषद गटातील खरशी-बारामुरे गणात भाजपकडून गोरखनाथ महाडिक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तसेच शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माथाडी नेते विठ्ठल गोळे यांचा पराभव केला. गोरखनाथ महाडिक यांना ४४९९ मते मिळाली, तर विठ्ठल गोळे यांना ३५६३ मते मिळाली.
मात्र म्हसवे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिल्पा शिंदे यांनी भाजपच्या रेश्मा पोपळे यांचा १९५ मतांनी पराभव करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. शिल्पा शिंदे यांना ४८५० मते मिळाली.
कुडाळ पंचायत समिती गणात सौरभ शिंदेंचा दणदणीत विजय
राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी कुडाळ पंचायत समिती गणातील लढत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुडाळ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे यांचा २०७७ मतांनी दारुण पराभव केला. सौरभ शिंदे यांना ५२०९ मते मिळाली.
इतर पंचायत समिती गणांचे निकाल
सायगाव पंचायत समिती गणात भाजपच्या चारोळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या साक्षी देशमुख यांचा २०८५ मतांनी पराभव करत ६१२७ मते मिळवली.
आंबेघर तर्फे मेढा पंचायत समिती गणात शिवसेनेचे आतिश कदम यांनी भाजपचे पत्रकार विजय सपकाळ यांचा ७२२ मतांनी पराभव करत मोठा धक्का दिला. आतिश कदम यांना ५१७५ मते मिळाली.
कुसुंबी पंचायत समिती गणात भाजपच्या पुष्पा चिकने यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सुनिता जोंधळे यांनी ४८२ मतांनी पराभव केला. सुनिता जोंधळे यांना ४२४९ मते मिळाली.
एकूण मतदानाचा ताळेबंद: भाजप पुढे, पण विरोधक बळकट
संपूर्ण जावळी तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना एकूण ५९,२२६ मते मिळाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला २६,५५५ मते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला २०,७८८ मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना ३,१२१ मते मिळाली.
विशेष म्हणजे, एवढी मोठी प्रचारयंत्रणा, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वैयक्तिक ताकद, कोट्यवधींची विकासकामे आणि कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा असूनही भाजपला विरोधी उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा अवघी सुमारे ९ हजार मतेच अधिक मिळाली. याचा अर्थ तब्बल ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी भाजपविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय अर्थ: भाजपला आत्मपरीक्षणाची गरज
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला जावळी तालुका भाजपने गेल्या दहा वर्षांत आपल्या ताब्यात घेत भाजपचा बालेकिल्ला बनवला होता. मात्र या निवडणुकीत शशिकांत शिंदे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ऋषिकांत शिंदे, संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम, एकनाथ ओंबळे यांच्यासह कट्टर शिवसैनिकांनी भाजपविरोधात ताकद एकवटत दोन पंचायत समितीच्या आणि एक जिल्हा परिषदेच्या जागा जिंकून दाखवल्या. राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असले तरी त्यांची उपस्थिती निर्णायक ठरली.
पंचायत समितीत सत्तासमीकरणे अडकली
जावळी पंचायत समितीत आता सहा सदस्यांपैकी तीन सदस्य भाजपविरोधी आहेत. त्यामुळे सभापतीपदाचा मार्ग सुकर नाही. चिठ्ठीद्वारे सभापती ठरवावा लागणार की पाठिंब्याच्या राजकारणातून सत्ता मिळवली जाणार, हे गुलदस्त्यात बंद झाले आहे.
एकंदरीतच, या निवडणुकीने जावळीतील राजकारणाला नवी दिशा दिली असून भाजपला मिळालेले यश जितके महत्त्वाचे आहे, तितकाच मिळालेला विरोधही धोक्याची घंटा ठरला आहे. जावळीचा भाजप बालेकिल्ला अजून उभा आहे, पण त्याच्या भिंतींमध्ये मोठ्या तडा गेले आहेत—हे मात्र या निकालाने स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!