जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज साठे व पोलीस निरीक्षक ताटे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. मोबाईल, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे संदेश, व्हिडिओ, फोटो अथवा राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. समाजाच्या भावना दुखावणारे, शांतता भंग करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा पोस्ट तयार करणारे, शेअर करणारे तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.



