व्हॉट्सॲप अफवांच्या राजकारणाला सडेतोड उत्तर; सौरभ शिंदेंचा राष्ट्रवादी उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) यांच्यावर थेट हल्लाबोल(व्हिडीओ)

व्हॉट्सॲप अफवांच्या राजकारणाला सडेतोड उत्तर; सौरभ शिंदेंचा राष्ट्रवादी उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) यांच्यावर थेट हल्लाबोल
कुडाळ/(प्रतिनिधी)
जनतेने अनेक वेळा नाकारलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) हे पुन्हा एकदा विकासपुरुष आणि जावळी तालुक्याचे भाग्यविधाते शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विचारांच्या विरोधात उभे राहिले असून, या भूमिकेतून त्यांनी नेमके काय साध्य केले, असा थेट आणि घणाघाती सवाल प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा) शिंदे यांनी उपस्थित केला. प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि चेअरमन सुनेत्रा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या अंगावर गुलाल टाकून संचालक झालेले आज कारखान्यावर टीका करत असल्याचे सांगत, हिंमत असती तर त्यावेळी विरोधी पक्षातून उमेदवारी घेऊन निवडून येऊन दाखवायचे होते, असे आव्हान देत सौरभ शिंदे यांनी राजेंद्र शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.


व्हॉट्सॲपवर न केलेल्या कामांची खोटी प्रसिद्धी करणे, दुसऱ्यांविरोधात बदनामीकारक मजकूर पसरवणे हाच काही विरोधकांचा उरलेला उद्योग असून, सध्या हा प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोपही सौरभ शिंदे यांनी केला. जनतेसमोर विकासाचे उत्तर देण्याऐवजी अफवा, आरोप आणि व्हॉट्सॲप युद्धाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.


प्रतापगड सहकारी साखर कारखान्याबाबत विरोधक केवळ बोलघेवडेपणा करत असून, यावर्षी विरोधकांनी स्वतःचा ऊस कोणत्या कारखान्याला घातला याचे स्पष्ट उत्तर जनतेला द्यावे, असे थेट आव्हान सौरभ शिंदे यांनी दिले. प्रतापगडचा कळवळा दाखवायचा आणि ऊस मात्र जरंडेश्वर कारखान्याला घालायचा, ही दुटप्पी भूमिका शेतकरी आणि जनता दोघांनाही चांगलीच माहीत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
जावळी तालुक्यात महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, विकासकामांची अक्षरशः वाहती गंगा तालुक्यात सुरू आहे, असे शिंदे यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असतील तर ती करण्यासाठी ठेकेदार लागणारच, मग ठेकेदार नसतील तर कामे कोण करणार, असा थेट सवालही त्यांनी विरोधकांना केला. विकासकामांवर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


काही विरोधकांकडून घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी, वारसाने संधी मिळते आणि कर्तृत्वाने ती सिद्ध करावी लागते, या भूमिकेतूनच आम्ही आजवर काम करत आलो असल्याचे सौरभ शिंदे यांनी स्पष्ट केले. राजकारणामध्ये केवळ आरोप करून नव्हे तर सामाजिक कार्यातून विश्वास निर्माण करावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
“सर्व संस्था माझ्याकडे आहेत,” असा आरोप विरोधक करत असतील, तर मग इतकी वर्षे सोसायटी त्यांच्या ताब्यात असताना बदल घडवण्याचा विचार का झाला नाही, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. कुडाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मालोजीराव (अण्णा) शिंदे हे सोसायटी अत्यंत व्यवस्थितपणे चालवत असून, आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुक्याचा सर्वांगीण विकास तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखाना अधिक ताकदीने चालवला जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत, मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्याने विजयी करून महाराज साहेबांचे हात बळकट करावेत, असे आवाहन सौरभ शिंदे यांनी केले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!