रायगड :
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील अडोशी टनेलजवळ अपघातात अडकलेला टँकर तब्बल ३२ तासांनंतर हटवण्यात आला आहे. मात्र अपघात हटवूनही मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही ठिकाणी अजूनही मोठी वाहतूक कोंडी आहे.
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनचालकांनी रस्त्यावरच गाड्या उभ्या करून झोप घेतल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली. खंडाळा ते पुण्याच्या दिशेने सुमारे २२ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली आहे.
बोरघाट घाटातील वाहतूक काही प्रमाणात मोकळी झाली असली तरी अपघाताचा परिणाम अजूनही जाणवत आहे. लोणावळा बायपास द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहतूक अडकून पडली आहे.
वाहतूक पोलीस ठिकठिकाणी अडकलेल्या वाहनचालकांना उठवून वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न करत आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग सुरळीत होण्यासाठी अजून २ ते ३ तास लागण्याची शक्यता आहे.



