
कुडाळ प्रतिनिधी( इम्तियाज मुजावर).. जावळी तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम रंगात; माघारीनंतर लढती स्पष्ट, संवेदनशील मतदारसंघांत तिरंगी–चौरंगी मुकाबले
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने जावळी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. मात्र माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झाले असून जावळी तालुका पुन्हा एकदा भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील थेट राजकीय संघर्षाचे केंद्र बनला आहे. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांचेही तगडे आव्हान असल्याने लढती अधिक रंगतदार झाल्या आहेत.
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या म्हसवे जिल्हा परिषद गटात शेवटपर्यंत उत्कंठावर्धक स्थिती होती. या गटातून भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव ज्ञानदेव मानकुंबरे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संदीप सर्जेराव पवार यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार संतोष दिनकर शिराळे (वाहगाव) यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पूनम प्रशांत नायकुडे (कुडाळ) यांनी उमेदवारी अंतिम ठेवली असून त्यांच्या विरोधात भाजपकडून जयश्री मणिलाल गिरी (महेगाव) यांनी दंड थोपटले आहेत. या गटात कुडाळ गावातील सर्वाधिक मतदारसंख्या निर्णायक ठरणार असून, कुडाळ गावच्या जयश्री संजय शेवते यांचे आव्हानही या निवडणुकीत महत्त्वाचे मानले जात आहे.
कुसुंबी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून कविता एकनाथ ओंबळे (केडंबे) तर भाजपकडून जिल्हा बँकेचे संचालक व जावळी तालुक्यातील ज्येष्ठ नेते ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे (आंबेकर) यांची उमेदवारी कायम आहे. या गटात शिवसेना–भाजप यांच्यात थेट सामना रंगणार असून अपक्ष कल्पना गणपत पार्टी (पुनवडी) यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवल्याने ही लढत अधिक चुरशीची ठरणार आहे.
पंचायत समितीच्या खरशी बारामुरे मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माथाडी कामगारांचे नेते विठ्ठल गुलाबराव गोळे यांनी भाजपचे गोरखनाथ सीताराम महाडिक (घोटेकर) यांना थेट आव्हान दिले आहे. याठिकाणी अपक्ष किरण हनुमंत गायकवाड (खरशी बारामुरे) यांचेही आव्हान लक्षवेधी ठरत आहे.
म्हसवे जिल्हा परिषद गटातील म्हसवे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या घरातीलच शिल्पा मिलिंद शिंदे (हुमगाव) यांच्याविरोधात भाजपकडून रेश्मा समाधान पोपळे तर अपक्ष संगीता दिनकर भिसे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.
सर्वाधिक राजकीय चर्चेत असलेल्या कुडाळ पंचायत समिती गणात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे हे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील प्रतापगड कारखान्याचे संचालक राजेंद्र रामचंद्र शिंदे हे राष्ट्रवादीकडून उभे आहेत. ‘चेअरमन विरुद्ध संचालक’ अशी ही लढत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय प्रशांत मारुती तरडे (उद्धव ठाकरे गट समर्थित) आणि अपक्ष राजेंद्र खाशाबा शेवते (कुडाळ) यांच्यामुळे येथे चौरंगी लढत होत आहे.
सायगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून साक्षी विजय देशमुख तर भाजपकडून चारुशिला विवेक पवार (आनेवाडी) यांच्यात दुरंगी लढत आहे. आंबेघर तर्फे मेढा मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ पत्रकार विजय बाबाजी सपकाळ यांच्याविरोधात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आतिश संतोष कदम अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. कुसुंबी पंचायत समिती गणात भाजपच्या पुष्पा जगन्नाथ चिकणे व विरोधात सुनिता विलास दुंधळे यांच्यात दुरंगी सामना निश्चित झाला आहे.
एकंदरीतच जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही भाजप विरुद्ध शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी तिरंगी राजकीय लढत ठरत असून, अपक्ष उमेदवारांचे आव्हानही अनेक ठिकाणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केळघर येथे झालेली सभा, भाजपचे आक्रमक नियोजन आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा—या सगळ्यामुळे येत्या पाच तारखेपर्यंत जावळी तालुक्यात निवडणुकीचा धुरळा अधिकच वाढणार, हे मात्र निश्चित.



