
वनविभागाचा दणका! कराडात शेड्युल-१ मधील दुर्मिळ ‘बो माऊथ गिटार मासा’ शिकार प्रकरणी कारवाई
कराड / सातारा :
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरलेल्या प्रकरणात सातारा वनविभागाने मोठी कारवाई करत शेड्युल-१ मध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या बो माऊथ गिटार मासा (Bowmouth Guitarfish) शिकार व प्रदर्शन प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल-१ भाग ‘E’ मध्ये समाविष्ट असलेला हा मासा आय.यू.सी.एन. (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) कडून “गंभीरपणे धोक्यात” (Critically Endangered) असल्याचे घोषित करण्यात आले असून, त्याचा रेड डेटा लिस्ट मध्ये समावेश आहे. अशा माशाची शिकार, विक्री, प्रदर्शन किंवा प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा ठरतो.
कराड आणि सातारा परिसरात सदर माशाचा व्हिडिओ प्रसारित करून तसेच त्याचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कराड येथील अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) आणि सातारा येथील ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरवार पेठ, सातारा) यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींविरोधात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनपाल सुनिल शिंदे, वनरक्षक कैलास सानप, अभिजीत शेळके, अक्षय पाटील आणि मुकेश राऊळकर यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित व दुर्मिळ वन्यजीवांबाबत कोणतीही माहिती, व्हिडिओ किंवा प्रदर्शन आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा. वन्यजीवांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा कडक इशाराही वनविभागाने दिला आहे.



