
कुडाळ | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जावळी तालुक्यातील मेढा येथील युवक तासगाव येथे दोन पिस्तुलांसह सापडल्याने जावळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला सुजल रामचंद्र धनावडे (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याच्या संपर्कातील काही संशयितांकडेही अनाधिकृत शस्त्रास्त्र असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून, आरोपी सुजल धनावडे यांच्या संपर्कात असणारी जावळी तालुक्यातील व अन्य ठिकाणी असणारी ‘चांडाळ चौकडी’ची चौकशी करण्यासाठी तासगाव व जावळी तालुक्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सर्व पोलीस ठाण्यांना कडक तपासाचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव–मनेराजुरी रस्त्यावरील चिंचणी फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित सुजल धनावडे याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. कसून चौकशीत हे पिस्तूल मध्य प्रदेशातील सेंधवा येथून मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून विकत घेतल्याची कबुली आरोपीने दिली. तसेच हे पिस्तूल तासगाव येथे विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने आणखी एक पिस्तूल व जिवंत काडतुसे मेढा येथील आपल्या घरी लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकत दुसरे पिस्तूल व काडतुसे असा तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईनंतर आता पोलिसांचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, सुजल धनावडे यांच्या मोबाईल संपर्क, कॉल डिटेल्स आणि हालचालींचा सखोल अभ्यास सुरू आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींकडेही बेकायदेशीर शस्त्रास्त्र असण्याची शक्यता असल्याने, जावळी तालुका आणि परिसरातील संशयित टोळक्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. लवकरच आणखी अटकसत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणी आरोपी सुजल धनावडे याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तासगाव पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मात्र, जावळी तालुक्यात अनधिकृत शस्त्रप्रकरणाचा हा गंभीर अँगल समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.



