सावली ग्रामपंचायतीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम : जिल्हा प्रशासनाचे कौतुक(व्हिडीओ)


सावली ग्रामपंचायतीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम : जिल्हा प्रशासनाचे कौतुक

सातारा, प्रतिनिधी :इम्तियाज मुजावर
ग्रामपंचायत सावली (ता. जावली) येथे यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक उपक्रमांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. “पर्यावरण पूरक गणेशोत्सव 2025” या संकल्पनेअंतर्गत गावात निर्माल्य व्यवस्थापन, कुंडाची पाहणी आणि स्वच्छतेचा प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष ठरला.

मंगळवारी ग्रामपंचायत सावली येथे मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिदे सर, जिल्हा तज्ञ अजय राऊत, विस्तार अधिकारी अमित पवेकर, गोविंद माने, ग्रामपंचायत सरपंच विजय सपकाळ, ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम, मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, सदस्य आनंदा जुनघरे, प्रकाश जुनघरे, तसेच स्थानिक ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात विशेष बाब म्हणजे निर्माल्य व्यवस्थापनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी. पाहणीदरम्यान विश्वास सिदे यांनी स्वतः हाती निर्माल्य घेऊन ट्रॉलीत भरत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या कृतीतून जिल्हा प्रशासनाने फक्त मार्गदर्शनच नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून दाखवली, हे ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरले.

यावेळी अजिंक्य नेहरू युवा मंडळ आणि ग्रामपंचायत सावली यांनी मिळून पर्यावरणपूरक गौरी-गणपती विसर्जनाचा आदर्श घालून दिला. विसर्जनानंतर जमा झालेले निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे व्यवस्थापन करण्यात आले. फुले, हार-तोरण, नैवेद्य यांचे वर्गीकरण करून त्याचे खतनिर्मिती तसेच पुनर्वापराच्या दिशेने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे नदी-ओढे, तलाव यांचे प्रदूषण टाळले गेले.

या उपक्रमाला उपस्थित राहून विश्वास सिदे यांनी ग्रामपंचायत सावलीचे, मंडळाचे आणि गावकऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. “गावागावातून अशा पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झाला तर सातारा जिल्हा राज्यात आदर्श ठरेल. ग्रामपंचायतीने दाखवलेला मार्ग संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.

ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम यांनी सांगितले की, यंदा ग्रामपंचायत व युवा मंडळाच्या समन्वयातून विशेष पद्धतीने उपक्रम आखला गेला. गावातील प्रत्येक घरापर्यंत पर्यावरणपूरक संदेश पोहोचविण्यात आला. “गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत बदलण्याची वेळ आली आहे. देवाचा उत्सव आनंदाचा असला पाहिजे, पण त्याच वेळी निसर्गाशी आपला ताळमेळ राखला गेला पाहिजे,” असेही ते म्हणाले.

मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर यांनी ग्रामस्थांच्या सहभागाचे कौतुक केले. “फक्त प्रशासनाकडून आदेश आले म्हणून नव्हे, तर गावकऱ्यांनी स्वखुशीने व जबाबदारीने सहभाग घेतला, ही खरी ताकद आहे. यामुळे गावात एकात्मता व जागरूकतेची भावना दृढ झाली आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने “पर्यावरणपूरक गणेशोत्सव, आपला गणपती – आपली जबाबदारी” या घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला. उपस्थित पाहुण्यांनीही सावली ग्रामपंचायतीने उभारलेला आदर्श अनुभवून कौतुक व्यक्त केले.

सावलीसारख्या छोट्याशा गावाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून जे उदाहरण घालून दिले आहे, ते संपूर्ण जिल्ह्यात पसरावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांचा सहभाग, प्रशासनाचे मार्गदर्शन आणि युवकांची पुढाकार वृत्ती यामुळे “ग्रामपंचायत सावली” ही साताऱ्यातील एक आदर्श पर्यावरणपूरक ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करत आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!