
स्वातंत्र्यदिनानिमित्त मेढा पोलिसांचे भव्य रक्तदान शिबिर; एपीआय सुधीर पाटील यांच्या पुढाकाराचे कौतुक
मेढा, ता. जावळी –इम्तियाज मुजावर
मेढा पंचक्रोशीतील जनतेसाठी नेहमी तत्पर आणि लोकाभिमुख कार्य करणारे मेढा पोलीस ठाणे यंदा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एक वेगळा, प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली आज बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत मेढा पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी मेढा पंचक्रोशीतील सर्व सुजाण नागरिकांना, तरुणाईला आणि विविध सामाजिक संघटनांना आवाहन करण्यात आले असून, “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश रुजवून समाजात मानवीयतेचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न मेढा पोलिसांकडून होत आहे.
एपीआय सुधीर पाटील यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक व जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. कायदा-सुव्यवस्थेसह सामाजिक भान जपणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पोलीस ठाण्याची जनतेशी असलेली जवळीक आणि लोकहिताचा दृष्टिकोन आणखी ठळकपणे अधोरेखित होणार आहे.
शिबिरादरम्यान सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रक्तदान प्रक्रियेचे काटेकोर पालन केले जाईल.
स्थान – मेढा पोलीस स्टेशन, मेढा
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अशा उपक्रमाने मेढा पोलीस ठाण्याची प्रतिमा केवळ कायद्याचे रक्षक म्हणून नव्हे, तर समाजाचे हितचिंतक आणि मानवी मूल्यांचे जतन करणारे केंद्र म्हणून अधिक भक्कम होणार आहे.