सातारा तालुक्यातील डबेवाडी गावात 125 वर्षांपासून स्वतःच्या घामाने, श्रमाने आणि हक्काने कसलेली सहा एकर जमीन बळकावण्यासाठी वाईच्या गोवर्धन संस्थेने, थेट वरिष्ठ राजकीय व प्रशासकीय वशिला लावून, कायदा व न्यायालयाला डावलत बेकायदेशीर कब्ज्याचा राक्षसी डाव रचल्याचा स्फोटक आरोप माने कुटुंबाने केला आहे.
तब्बल 42 वर्षांपासून या जमिनीवर खटला सुरू असून, सातारा दिवाणी न्यायालयाचा स्पष्ट स्थगिती आदेश असतानाही, जिल्हा प्रशासनाचा लवाजमा घेऊन अचानक कब्जा मोहीम हाती घेण्यात येत असल्याने शेतकरी संतापाच्या टोकावर पोहोचले आहेत. ही जमीन फक्त शेतीच नाही, तर माने कुटुंबाचे घर, उपजीविका आणि जगण्याचा आधार आहे. कब्जा झाला तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येणार!

“जमीन बळकावण्यापूर्वी आमच्या 20 जणांच्या मृतदेहांवरूनच जावे लागेल. आम्ही कुटुंबासकट आत्महत्या करू” – असा थेट, लिखित आणि निर्भीड इशारा माने कुटुंबाने जिल्हा प्रशासनाच्या तोंडावर आपटला आहे. उद्या मोठ्या प्रमाणात आत्महत्येचा इशारा दिल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे.

माने कुटुंबाचा थेट सवाल – “न्यायालयाचा स्टे असताना आणि खटला जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभागात प्रलंबित असतानाही आमच्या जमिनीवर नांगर फिरवण्यासाठी कोणत्या ‘मोठ्या हाताचा’ वरदहस्त आहे?”
डबेवाडीत आता परिस्थिती स्फोटक बनली आहे. माने कुटुंबाचा स्पष्ट शब्दांत इशारा – “कब्जा करायला या… पण आधी मृतदेह उचलायला तयारी ठेवा!”