
(इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून )सावलीचा अभिमान – पत्रकार ते आदर्श सरपंच, विजय सपकाळ यांची विलक्षण कहाणी
सावली गाव… जावळी तालुक्याच्या नकाशावरचे एक छोटेसे नाव. पण आज या गावाची ओळख केवळ भौगोलिक मर्यादेत अडकलेली नाही, तर विकास, आदर्श नेतृत्व आणि लोकाभिमुख कारभारासाठी जिल्हाभर गाजत आहे. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत एक अद्वितीय व्यक्तिमत्व – मा. विजयजी सपकाळ.

दैनिक सकाळमध्ये सलग ३० वर्षांचा सडेतोड पत्रकारितेचा अनुभव असलेले विजय सपकाळ यांनी आपल्या शब्दांच्या धारदार लेखणीने अन्याय, भ्रष्टाचार आणि समाजातील विसंगतींना नेहमीच धडक दिली. बहुजन समाजाचा बुलंद आवाज, सामाजिक प्रश्नांचा भेदक मांडणीकार आणि गोरगरीब जनतेचा खरा साथीदार — हीच त्यांची खरी ओळख.

पण विजय सपकाळ यांची ओळख केवळ पत्रकारापुरती मर्यादित नाही. “पत्रकाराची लेखणी आणि सरपंचाचे नेतृत्व” यांचा संगम घडवून त्यांनी सावली गावाला विकासाच्या दिशेने नेणारा नवा आराखडा तयार केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावात एकामागोमाग एक विकासकामे राबवली — रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि आधुनिक सोयीसुविधा यामुळे सावली आज ‘जिल्ह्यातील नंबर वन गाव’ बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

गावातील कोणताही नागरिक असो — श्रीमंत की गरीब — विजय सपकाळ यांच्या दारात गेल्यावर त्याला न्याय आणि आधार मिळेल, ही खात्री प्रत्येकाला असते.
त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, निर्णयांमध्ये लोकशाही आणि व्यवहारात दिलखुलासपणा आहे.

जावळी तालुक्यातील कोणतेही कार्यालय असो, सरकारी अधिकारी असो की राजकीय नेते — विजय सपकाळ यांच्या कार्यतत्परतेला सर्वत्र सलाम केला जातो. कारण ते स्वतः कधीही पद, पैसा किंवा सत्ता यासाठी धावत नाहीत, तर लोकांच्या हितासाठी पदाचा उपयोग करतात.
पत्रकारितेच्या रणांगणात जशी त्यांची भाषा टोकदार, तशीच गावाच्या विकासाच्या रणांगणात त्यांची कृती झंझावाती. प्रसंगी रोखठोक, प्रसंगी समंजस — पण प्रत्येक वेळी समाजहिताचा विचार प्राधान्याने.

आज सावली गावातील मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकजण अभिमानाने म्हणतो —
“आपल्याला पत्रकार असलेला सरपंच मिळाला, आणि सरपंचामध्ये माणुसकीचा पत्रकार जगतोय.”

विजय सपकाळ हे फक्त एक व्यक्ती नाहीत, तर ते एक विचारधारा आहेत —
“पत्रकारितेचा सचोटीचा वारसा आणि नेतृत्वाची जबाबदारी यांचा अद्वितीय संगम.”