हरकाम्या रवींद्र चव्हाणांच्या जगण्यात माणुसकीचा हात – ‘रवींद्र’ने दिला रवींद्रला आधार”


कुडाळ (प्रतिनिधी)….वडाचे मसवेतील हरकाम्याला माणुसकीचा हात — माजी उपसभापती रवींद्र परामने यांचा आदर्शवत उपक्रम

जावळी तालुक्यातील वडाचे मसवे हे छोटेसे गाव… गावातील प्रत्येक घराचे, प्रत्येक कुटुंबाचे चाक सुरळीत फिरावे म्हणून दिवस-रात्र काम करणारा हरकाम्या रवींद्र चव्हाण. कुणी घराचे ओझे हलके करायला सांगितले, कुणाला शेतात मदत हवी, कुणाचे घरकाम, कुणाचा छोटासा पण महत्वाचा संदेश पोहोचवायचा — अशा शेकडो लहानसहान पण अत्यावश्यक कामात तो नेहमी धावत असतो. त्याच्या बदल्यात मोबदला फारसा नसतो, फक्त एक वेळचे जेवण आणि गावकऱ्यांचे थोडेसे प्रेम — हाच त्याचा खरा मानधन.

गेल्या कित्येक वर्षांपासून निःस्वार्थ भावनेने काम करत असलेला हा हरकाम्या अलीकडेच चर्चेत आला, जेव्हा पत्रकार इम्तियाज मुजावर यांनी “हरकाम्या रवींद्र हवा आहे जगण्यासाठी आधार” ही बातमी प्रसिद्ध केली. या बातमीने असंख्यांच्या मनात हळवेपणा आणि विचार जागा केला.

हीच बातमी वाचून जावळी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परामने यांचे मन हेलावले. माणुसकीच्या धर्माला जागत, त्यांनी आपले नावधारी भाऊ रवींद्र चव्हाण याला आर्थिक मदतीचा हात पुढे केला. इतकेच नव्हे, तर वडाचे मसवे व कुडाळ परिसरातील नागरिकांनाही “या हरकाम्याला आपल्या क्षमतेनुसार आधार द्या” असे मनापासून आवाहन केले.

आजच्या काळात, जेव्हा स्वार्थ आणि व्यक्तिगत फायद्याचे विचार समाजात पसरत चालले आहेत, अशा वेळी रवींद्र परामने यांचा हा आदर्शवत उपक्रम माणुसकीची खरी ओळख करून देणारा आहे. मदतीच्या या हाताने केवळ रवींद्र चव्हाण याला नव्हे, तर संपूर्ण समाजाला आशेचा किरण दिला आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!