
पुणे | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भूषण पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे एकत्र आले… आणि सगळं राजकीय समीकरणच हललं!
दोन दिवसांपूर्वीच जावळी तालुक्यात शशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आणि राजे समर्थकांमध्ये राजकीय घमासान पेटलेलं. त्यात शिवेंद्रसिंहराजेंनी थेट मोर्चा थांबवून ‘तणाव संपवला’. आणि आता, याच पार्श्वभूमीवर पुण्यात या दोन्ही दिग्गजांची ‘मैत्री दिन स्पेशल भेट’ राजकारणात चर्चेचा तुफान विषय बनली आहे.

सर्वात गाजलेली गोष्ट म्हणजे — शिवेंद्रसिंहराजेंनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर शशिकांत शिंदे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला! फोटोमध्ये दोन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज, एकमेकांना दिलेला सन्मान, आणि मैत्रीपूर्ण स्मित… यांनी राजकीय गल्लीपासून व्हॉट्सअॅप ग्रुपपर्यंत चर्चा पेटवली आहे.
“राजकारणात विरोध असतो, पण राजकारणाच्या पलीकडे मैत्री जिवंत ठेवायची असते” — हा संदेश या फोटोतून स्पष्टपणे दिसतो, असं राजकीय वर्तुळ सांगतंय. आगामी काळातील जिल्ह्यातील सत्तासमीकरणावर या ‘एक फोटो’चा किती परिणाम होईल, याबाबत आता अटकळी सुरू झाल्यात.

राजकारण, युद्ध आणि क्रिकेटमध्ये काहीही शक्य असतं — या जुन्या म्हणीप्रमाणे, आजचे प्रतिस्पर्धी उद्या मित्र होऊ शकतात आणि ‘होत्याचं नव्हतं’ देखील एका क्षणात घडू शकतं. कार्यकर्त्यांनी तणाव वाढवण्यापेक्षा मोठ्या मनाने राजकारणात राजकारण आणि मैत्रीत मैत्री जपायला हवी, हा या भेटीचा संदेश मानला जातोय.
आता प्रश्न असा — हा फक्त ‘मैत्री दिनाचा फोटो’ आहे, की साताऱ्याच्या राजकारणात नवीन समीकरणांची बीजे रोवणारा पहिला सिग्नल?
राजकीय वर्तुळातला माहोल पाहता, हा फोटो पुढच्या निवडणुकीतील ट्रस्ट-बिल्डिंगची सुरुवात ठरू शकतो, असा कानगोष्टींचा सूर आहे.