
मेढा | प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील सुपुत्राला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर मान मिळाल्याचा उत्सव सुरू असताना, दत्तात्रय पवार उर्फ भालेघरे यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या निषेध मोर्चावरून तालुक्यात नवा वाद पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा उपाध्यक्ष संदिप पवार यांनी वसंतराव मानकुंमरे यांच्यावर थेट घणाघात केला आहे.

मेढा येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले –
👉 “ज्याची तालुक्यात ओळखच नाही, ज्याच्यावर एसआयटी चौकशी सुरू आहे, त्याच्या पाठीशी उभं राहून मोर्चा काढणं म्हणजे सरळसरळ नौटंकी आहे. मानकुंमरे यांना तहसिल कार्यालय आणि विधान भवन यातला फरकच कळत नाही.”
पवारांचा आरोप –
👉 “मोर्चासाठी दोन वेळेचं जेवण, स्वेटर-जर्किन वाटप, प्रत्येक गाडीला तीन हजार भाडं… हा निषेध नाही, हा सवलतींचा पॅकेज मोर्चा आहे.”
ते पुढे म्हणाले –
👉 “जावळीतील जनता अजूनही वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी झगडते आहे. गेली दहा वर्षे पानस-हातेघर रस्ता रखडला आहे, बावधन रस्ता रखडलेला आहे, कॅनॉलचं पाणी शेतात पोहोचलेलं नाही. हे प्रश्न सोडवायला वेळ नाही, पण मुंबईचा वाद जावळीत आणायचा. ही जनता माफ करणार नाही.”
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचं समर्थन करताना पवार म्हणाले –
👉 “जावळीच्या सुपुत्राला महाराष्ट्राच्या राजकारणात मिळालेलं पद हा तालुक्याचा अभिमान आहे. अशा सुपुत्राचा सत्कार हा संस्काराचा भाग आहे. पण भालेघरे यांच्यासाठी मोर्चा काढणं म्हणजे जावळीच्या स्वाभिमानाचा अपमान आहे.”
शेवटी त्यांनी थेट इशारा दिला –
👉 “आज तुमचं मौन म्हणजे उद्याचं पतन ठरेल. उठा, विचार करा आणि ढोंगी नेतृत्वाचा पर्दाफाश करा.”
पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका उपप्रमुख राजेश माने, शहर प्रमुख संजय सुर्वे, तालुका अध्यक्ष सतिश पवार, सरपंच श्रीरंग गलगले आदी उपस्थित होते.