
कर्तव्यदक्षते सोबतच संस्कृती जपणाऱ्या महिला पोलिसांचा ‘मंगळागौर’ थाटात!
डॉ. वैशाली कडुकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमाने महिला पोलिसांची प्रतिमा आणखीन बळकट
सातारा, प्रतिनिधी( इम्तियाज मुजावर)
खाकी गणवेशाच्या मागेही एक हसतं-खेळतं, सण-उत्सव जपणारं हृदय असतं, हे साताऱ्यातील मंगळागौर कार्यक्रमाने सिद्ध केलं. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला आयोजित पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमात महिला पोलिसांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतली चमक ही त्यांच्या कर्तव्यापलीकडील ‘माणूसपणाची’ जिवंत झलक होती.

सातारा पोलिस दलातील या कार्यक्रमाच्या संकल्पनेमागे होत्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर – महिला पोलिसांकरता ‘कडक अधिकारी’ असतानाच ‘आपली माणसं’ म्हणून विचार करणाऱ्या. कर्तव्यासोबतच संस्कृतीची वीण घट्ट ठेवणाऱ्या या कार्यक्रमाने महिला पोलिसांचा आत्मसन्मान उंचावला आहे.

पारंपरिक नऊवारी साड्यांत, गजऱ्यांनी सजलेल्या आणि हसतमुख चेहऱ्यांनी फुगड्यांच्या गिरक्या घेताना या महिला पोलिसांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून असे वाटत होते की, ‘कर्तव्यदक्षतेबरोबरच त्या संस्कृतीचीही लढाई जिंकत आहेत’.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री दोशी यांच्या हस्ते मंगळागौर पूजनाने झाले. स्वरूप सखी मंडळ, सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक फुगड्या, सुप, लाटणे, मुसळ यासारख्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या खेळांनी वातावरण रंगतदार झालं.

या कार्यक्रमासाठी DYSP आश्लेषा हुले, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काटकर, श्वेता पाटील, माधुरी देशमुख, महिला पोलीस मोनाली निकम, मुनीर मुल्ला, हवालदार नाचण यांनी परिश्रम घेतले.
डॉ. कडुकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून महिला पोलिसांसाठी सण, समारंभ हे फक्त ‘घरी राहिलेलं स्वप्न’ राहू नये यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांचे हे नेतृत्व आता ‘प्रशासकीय’ मर्यादेपलीकडे जाऊन ‘सामाजिक-सांस्कृतिक’ प्रेरणास्थान ठरत आहे.

सणाच्या निमित्ताने काही तास खाकीचा भार उतरवून, मंगळागौरच्या सळसळत्या उत्साहात बुडालेल्या या महिला पोलिसांनी हे दाखवून दिलं – खाकी वर्दी मागेही एक सजीव, संस्कारी, उत्सवी महिला उभी आहे – आणि त्या प्रतिमेचं नाव आहे ‘गौरवशाली महिला पोलीस!’