
प्रतिनिधी इम्तियाज मुजावर
बामणोली, ता. जावळी:
वयाच्या एका कठीण वळणावर माणुसकीचा हात साथ देतो, तर तीच खरी आपली मिळकत असते. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं हुमगाव हायस्कूलच्या दहावीच्या १९९०-९१ बॅचच्या वर्गमित्रांनी.
बामणोली येथील हिंदुराव तरडे यांच्या कन्या कुमारी लावण्या हिला ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे गंभीर आजारासाठी उपचार सुरू असून, यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. ही बाब वर्गमित्रांना समजताच, कुठलाही वेळ न घालवता मदतीसाठी एकजुटीने पुढे आले.
ग्रुप अॅडमिन संजय परामणे (सोमर्डी), राजेश तरडे (पोलीस पाटील, बामणोली) आणि साधना अनपट यांनी तत्काळ सर्व वर्गमित्रांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. आणि काय आश्चर्य! ३४ वर्षांपूर्वी एकाच वर्गात शिकलेल्या मित्रमैत्रिणींची माणुसकीची वीण आजही इतकी मजबूत आहे की, काही तासांतच ₹५१,००० ची रक्कम जमा झाली आणि ती थेट हिंदुराव तरडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या मदतीत रामदास पवार (भालेघर), लता गोळे, संतोष पार्टे, शशिकांत नवसरे, नयना दाभाडे, निर्मला धापते नवसरे, संतोष तरडे, अनिल परामणे, सुषमा परामणे, शिवाजी पोफळे, ज्ञानेश्वर भिलारे, मीनाक्षी महाडिक, बाळू भिलारे, अंबादास पाडळे, दीपक पाडळे, लता शेलार, अनिता सोनवणे, शुभांगी जोशी, संगीता काळे, वंदना भोसले, प्रकाश पोफळे, विलास पवार, जितेंद्र देसाई, मनोज गायकवाड, राजेंद्र रसाळ, तानाजी भिलारे, श्रीकांत पार्टे अशा विविध गावातील जुन्या विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला.
ही रक्कम केवळ आर्थिक मदत नसून, ती मैत्रीच्या नात्याची, माणुसकीच्या नात्याची जिवंत साक्ष आहे. आजच्या काळात जेव्हा नाती तुटत चालली आहेत, तेव्हा या घटनेने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे.
– “मैत्री ही केवळ शालेय काळापुरती मर्यादित नसते, ती आयुष्यभरासाठी असते” हे यानिमित्ताने साऱ्या समाजाला उमगलं आहे “लावण्याला लवकर बरे वाटो,” अशीच प्रार्थना या सर्व वर्गमित्रांच्या मनात आहे.