
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक एन्ट्री; तीन दिवसांचा मुक्काम, राजकीय चर्चांना उधाण
सातारा | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या महाबळेश्वर तालुक्यातील मूळगाव दरेगाव येथे तीन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी पाच वाजता ते थेट हेलिकॉप्टरने मुंबईहून दरेगाव येथे दाखल झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी यांचाही उपस्थितीत समावेश होता.

या दौऱ्यात उपमुख्यमंत्री उद्या (१७ एप्रिल) एका खासगी घरगुती कार्यक्रमात दिवसभर सहभागी होणार आहेत. तसेच १८ एप्रिल रोजी ग्रामदैवताच्या पूजेसाठी त्यांच्याच हस्ते विशेष धार्मिक विधी आयोजित करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पूर्णपणे निजी असूनही, त्यांच्या अचानक उपस्थितीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच खळबळ निर्माण झाली आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण आणि विविध गटांतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर, शिंदे यांचा सातारा जिल्ह्यातील दौरा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.
या तीन दिवसांच्या मुक्कामात ते कोणत्या नेत्यांना भेटतात, स्थानिक पातळीवरील कोणत्या हालचाली घडतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.