
महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव (माती गट),तर
पृथ्वीराज आणि शिवराज (गादी गट) अंतिम फेरीत भिडणार
फिरोज मुलाणी
अहिल्यानगर दि
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी आणि माती गटातील अंतिम फेरीचे चित्र शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चुरशीच्या लढतीत स्पष्ट झाले आहे. माती गटात सोलापूरचा महिंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात लढत होणार आहे. गादी गटात पुणे शहरचा पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे भिडणार आहेत रविवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी कोण होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

अहिल्या नगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी, वाडीया पार्क येथे सुरू असलेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ६५, ७४, ९२, ७०, ९७ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पाहावे लागेले. काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दोन्ही सत्रातील श्वास रोखून धरायला लावणाऱ्या उत्कंठा वर्धक लढतींनी उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली.

शनिवारी सायंकाळी उशिरा माती गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत सोलापूर जिल्हा आणि शहराचे प्रतिनिधित्व करणारे महेंद्र गायकवाड बाहुबली आणि विशाल बनकर एकमेकांशी भिडले होते.सलामीला महेंद्र हप्ते डावावर विशालला चितपट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र भक्कम बचाव करीत विशालने हाणून पाडला.या झटापटीत विशालला झोनच्या बाहेर ढकलत एक गुणाने महेंद्रने खाते उघडले. पहिल्या फेरीत विशाल खाते उघडण्याची संधी महेंद्रने मिळून दिली नाही.पहिली फेरी जिंकून दबाव वाढवला होता.दुसऱ्या फेरीत देखील महेंद्रने ताकदीच्या बळावर हप्ते भरण्याचा प्रयत्न केला.झोन बाहेर काढत तब्बल तीन गुण मिळवून आघाडी घेतली होती. उरलेल्या दोन मिनिटात आघाडीवर असलेल्या महिंद्रने बचावात्मक पवित्रा घेतला होता. त्यामुळे पंचानी निष्क्रियतेबद्दल विशालला एक गुण दिला शेवटपर्यंत रंगलेले चुरशीची लढत महेंद्रने खिशात टाकत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत परभणीच्या साकेत यादव याने गोंदियाच्या सुहास गोडगे याचा ८-२ अशा गुणाधिक्यांनी फडशा पाडत मातीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात माती विभागातील अंतिम लढत आज रविवारी सायंकाळी होणार आहे.
गादी गटातील उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत
पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने मुंबईच्या सतपाल शिंदे याचा ११-० पराभव करीत आपले इरादे स्पष्ट केले.खेमी आणि भारंदाज आणि मोळी डावावर प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणाऱ्या पृथ्वीराजने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने अहिल्या नगरच्या चेतन रेपाळेला सलामीनंतर एका मिनिटाच्या आत तांत्रिक गुणाधिक्यावर नामोहरम केले. डबल महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी आखाड्यात उतरलेला मुळचा पुण्याचा शिवराज आणि पुणे शहराचा बिलवा तुफानी मल्ल पृथ्वीराज गादी गटात अंतिम फेरीत लढणार आहेत.गादी गटातील विजेता आणि माती गटातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादीवर अंतिम लढत होणार आहे.
उपउपांत्य फेरीच्या लढतीत महेंद्र गायकवाडला सांगलीच्या संदीप मोटेने चांगलेच झुंजवले.महेंद्रने सात विरुद्ध शून्य गुणांनी बाजी मारली.वेताळ शेळके विरुद्ध प्रकाश बनकर हे सोलापूर जिल्ह्यातील दोन मल्लातील लढत चुरशीची झाली. पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना विशालने दुसऱ्या फेरीत गुणांची कमाई करत आघाडी कमी केली. शेवटचा एक मिनिट उरला असताना दमलेल्या वेताळला चितपट केले ..
गोंदियाच्या सुहास गोडगेने पुण्याच्या आकाश रानवडेवर पाच विरुद्ध शून्य गुणांनी मात केली.परभणीच्या सचिन यादवने भंडाऱ्याचे विक्रमसिंह भोसले वर तांत्रिक गुणाधिक्याने विजय संपादन केला.
गादी गटात मुंबई उपनगरच्या सतपाल शिंदेने गोंदियाच्या सतीश मुळेचा सहा विरुद्ध चार गुणांनी पराभव केला.पुण्याचा बलदंड ताकतीचा पृथ्वीराज मोहोळ पुढे धनाजी कोळीची मात्रा चालली नाही .अहिल्यानगरचा चेतन रेपाळे आणि सोलापूरच्या सागर खरात यांच्यातील चुरशीच्या लढतीत चेतन रेपाळे तीन गुण विरुद्ध एक गुणांनी विजय ठरला.तर बलदंड शरीरयष्टी च्या शिवराज राक्षेने अ.नगरच्या सुदर्शन खोतकरला आसमान दाखवले.
चौकट
आ. संग्राम जगताप कुस्ती संघाचे राज्य उपाध्यक्ष
कुस्तीगीर संघाचे राज्याध्यक्ष माजी खासदार रामदास तडस कार्याध्यक्ष संदीप भोंडवे सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत अहिल्यानगर कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली
चौकट
झी कुस्ती दंगल सुरू करण्यासाठी प्रयत्नशील
कुस्ती हा मर्दानी खेळ झी टॉकीजचा जिव्हाळ्याचा विषय आहे. झी टॉकीजचे निर्माते भावेश दानवलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झी कुस्ती दंगल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही झी टॉकीजचे सहाय्यक कार्यकारी निर्माते गणेश चव्हाण यांनी कुस्ती आखाड्यात जाहीर केले. कुस्ती शौकिनांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयाचे कौतुक केले.