“सौरभ शिंदेंच्या भुलथापांना बामणोलीकर मतातून उत्तर देणार; खोट्या विकासाचा पर्दाफाश अखेर बामनोलीकरच करणार!” — प्रशांत तरडे

कुडाळ (प्रतिनिधी) बामणोलीत कोपरा सभेत आरोप–प्रत्यारोपांचा जोर;
प्रशांत तरडे यांचे भाजप उमेदवाराला थेट आव्हान
बामणोली येथे झालेल्या कोपरा सभेत कुडाळ पंचायत समिती गणाच्या प्रचारादरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ गणाचे अधिकृत उमेदवार प्रशांत तरडे यांनी भाजपच्या उमेदवारावर जोरदार टीका करत खोट्या आश्वासनांवर आणि भावनिक भुलथापांवर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
सभेत बोलताना प्रशांत तरडे म्हणाले की, भाजपचा उमेदवार स्वतःला ‘चॉकलेट बॉय’ म्हणवत विकासकामांचा खोटा डांगोरा पिटत असून, आजोबांच्या आमदारकीच्या जीवावर भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून न केलेल्या विकासकामांचाही श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, संबंधित मंत्री हे केवळ गेल्या एक वर्षापासूनच मंत्री झाले आहेत, त्याआधी ते फक्त आमदार होते. एका आमदाराकडे किती विकासनिधी असतो, हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे भुलथापा मारताना तरी वस्तुस्थिती लक्षात ठेवावी, असा टोला त्यांनी लगावला.
प्रशांत तरडे पुढे म्हणाले की, भाजपचा उमेदवार स्वतःच्या सदस्यपदाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता. आमदारांनी केलेली विकासकामे ही त्यांची वैयक्तिक देणगी नसून, जनतेच्या कररूपी पैशातून शासनाकडून मंजूर झालेल्या निधीतूनच होत असतात. मतदारांनी आमदारांना निवडून दिले आहे ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच, हे विसरता कामा नये.
बामणोली गावातील भैरवनाथ मंदिराजवळील संरक्षण भिंत आणि हनुमान मंदिराचे अपूर्ण काम यावरूनही त्यांनी सवाल उपस्थित केले. भैरवनाथ मंदिराजवळील संरक्षण भिंत निवडणूक जाहीर होण्याआधीही अस्तित्वात होती, मग ती आताच का आठवली? जर इतकीच काळजी होती, तर मंत्री साहेबांनी यासाठी आधी निधी का दिला नाही? हनुमान मंदिराचे कामही अनेक वर्षांपासून रखडलेले आहे, मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे मुद्दे कसे काय दिसू लागले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपण कोणत्याही निवडून आलेल्या पदावर नसतानाही, प्रत्येक वेळी सत्ताधारी शासनाकडून बामणोली गावासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून आणली असल्याचा दावा प्रशांत तरडे यांनी केला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप उमेदवाराला खुले आव्हान दिले की, स्वतःच्या पंचायत समिती सदस्यपदाच्या तसेच उपसभापती पदाच्या कार्यकाळात बामणोली गावात किती कोटी रुपयांची विकासकामे केली, याची माहिती जाहीर करावी.
सभेत त्यांनी भाजप उमेदवाराच्या एका वक्तव्याचाही समाचार घेतला. “प्रत्येक निवडणुकीत उभे राहून फक्त ५–२५ मते मिळतात,” या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रशांत तरडे म्हणाले की, कदाचित त्यांना स्मृतीभ्रंश झाला असावा. २०१२ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत याच बामणोलीच्या स्वाभिमानी जनतेने मला जवळपास १००० मते देऊन योग्य उत्तर दिले होते, हे विसरता कामा नये, असे ते म्हणाले.
शेवटी प्रशांत तरडे यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, बामणोलीचे स्वाभिमानी मतदार यावेळी भुलथापा आणि खोटी आश्वासने नाकारून मला आतापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य देतील, याची मला शंभर टक्के खात्री आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!