सातारा | प्रतिनिधी(इम्तियाज मुजावर)
उतार वयात खांद्याचे स्नायू जीर्ण होऊन फाटल्यामुळे रुग्णाला हात खांद्याच्या वर उचलणेही जिकीरीचे होते. अशाच स्थितीत असलेल्या साताऱ्यातील ५० वर्षीय महिलेस यशस्वी उपचार देत, साताऱ्यात प्रथमच गुंतागुंतीची ‘रोटेटर कफ’ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करण्यात आली असून, स्थानिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

या बाबत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन डॉ. सुरेश शिंदे यांनी माहिती दिली की, हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या ऑर्थोपेडिक सर्जन व खांदा-गुडघा तज्ज्ञ डॉ. कपिल जगताप यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. कपिल जगताप यांनी पुण्यातील नामांकित संचेती हॉस्पिटल आणि दक्षिण कोरियातील ईव्हा युनिव्हर्सिटी येथे या प्रक्रियेचे सखोल प्रशिक्षण घेतले आहे.
जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि अद्ययावत सुविधा सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध असून, याच ठिकाणी आता माफक दरात अशा उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध होत आहेत, ही सातारकरांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे ठणठणीत असून, यानंतरही अशा गुंतागुंतीच्या ऑर्थोपेडिक उपचारासाठी सातारकरांना पुणे-मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
- साताऱ्यातील पहिली यशस्वी रोटेटर कफ सर्जरी
- डॉ. कपिल जगताप यांची प्रमुख भूमिका
- साऊथ कोरियामधून घेतलेलं विशेष प्रशिक्षण
- साताऱ्यातच जागतिक दर्जाच्या ऑर्थोपेडिक सुविधा