साताऱ्याच्या पत्रकारितेचा विश्वासू चेहरा: संतोष नलावडे यांचा वाढदिवस

साताऱ्याच्या पत्रकारितेचा विश्वासू चेहरा: संतोष नलावडे यांचा वाढदिवस


सातारा इम्तियाज मुजावर
सातारा तालुक्यातील वाढे या गावाचे सुपुत्र आणि टीव्ही नाईन मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेल्या १७–१८ वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक माध्यमात भक्कम उपस्थिती नोंदवणारे संतोष नलावडे हे नाव आज सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेतील विश्वास, संयम आणि कार्यतत्परतेचे प्रतीक बनले आहे. त्यांच्या शांत, संयमी स्वभावासोबतच चेहऱ्यावरचे कायमस्वरूपी हास्य आणि तळागाळापर्यंत पोहोचणारी बातमीदारी ही त्यांची ओळख ठरली आहे.


सातारा जिल्हा भर पसरलेल्या त्यांच्या कामाच्या व्याप्तीत गावागावातील सामान्य नागरिकांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहज संपर्क दिसून येतो. राजकीय घडामोडी असोत, सामाजिक प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी—नलावडे यांनी साताऱ्याचा नाडीचा ठाव घेत, बातमीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला. “बातमी नसताना जिथे इतर थांबतात, तिथून नलावडे सुरू होतात,” अशी भावना अनेक पत्रकार सहकाऱ्यांची आहे.


पत्रकारितेतील स्पर्धेच्या काळातही सहकाऱ्यांना मदतीचा हात देणारा, माहितीची देवाणघेवाण करणारा आणि प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारा ‘राजा माणूस’ म्हणून त्यांची ख्याती आहे. राग आला तरी क्षणात विसरून पुन्हा मैत्रीचा धागा जपणारी त्यांची वृत्ती सर्वांना आपलेसे करते. त्यामुळेच सामान्य नागरिकांच्या मनात आणि प्रशासनाच्या दालनातही “आपला माणूस” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.


टीव्ही नाईनच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील असंख्य दर्जेदार बातम्या राज्याच्या पटलावर आणण्याचा त्यांचा हातखंडा आजही तितकाच प्रभावी आहे. स्थानिक प्रश्नांना आवाज देत त्यांनी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी जपली. मनातली गोष्ट बोलण्यासाठी आणि समस्येचे समाधान शोधण्यासाठी अनेकजण ज्यांच्याकडे धाव घेतात, तो विश्वासाचा आधार म्हणजे संतोष नलावडे.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, मित्रपरिवार आणि असंख्य नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यतत्परता, प्रामाणिकता आणि माणुसकीच्या बळावर उभे राहिलेले हे व्यक्तिमत्त्व प्रत्येकाच्या मनाच्या हृदयसिंहासनावर विराजमान राहो—याच शुभेच्छा!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!