
सातारा हॉस्पिटल मध्ये डायलिसिस साठी आलेल्या रुग्णाची हरवलेली सोन्याची अंगठी सातारा हॉस्पिटल मधील प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे संबंधित रुग्णाला परत मिळाली. कर्मचाऱ्यांमधील या प्रामाणिकपणाचा हॉस्पिटल व्यवस्थापनाने गौरव केला.
त्याचं झालं असं, सुरेश रामू जाधव ( रा. विलासपूर, गोडोली) हे सातारा हॉस्पिटलच्या सातारा डायलिसिस सेंटर मध्ये नियमित उपचारासाठी येतात. दोन दिवसांपूर्वी डायलेसिसला आले असताना ते सातारा हॉस्पिटलच्या रिसेप्शन मध्ये काहीवेळ बसले होते. त्यानंतर डायलेसिस घेऊन ते घरी गेले. रात्री बोटात अंगठी नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. जाधव कुटुंबीयांनी तत्काळ हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. दरम्यान, तोपर्यंत हॉस्पिटल मधील मामा शंकर गायकवाड यांना हरवलेली सोन्याची अंगठी सापडली होती. त्यांनी ती प्रामाणिकपणे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे जमा केली होती.
आज सुरेश जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन संबंधित कर्मचाऱ्याची भेट घेतली व त्याच्या प्रामाणिक वृत्तीचे कौतुक करत आभार मानले. तसेच स्वेच्छेने मामा शंकर गायकवाड यांना बक्षीसही दिले. यावेळी सातारा हॉस्पिटलचे सीनियर चीफ मेडिकल ऑफिसर विकास जाधव, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख, एचआर विभागाच्या धनश्री इनामके, श्रीमती शोभा वाघ आदी उपस्थित होते. डॉ. विकास जाधव यांनी हॉस्पिटल मधील मामा श्री. शंकर गायकवाड यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत ‘आमच्या हॉस्पिटल मधील प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे,’ असे गौरवोद्गार काढले.