
सातारा वनविभागाची डॅशिंग कारवाई! मसूरमधील महावीर सॉ मिल सील, अवैध सागसाठा जप्त
सातारा : वनसंपत्तीची लूट करणाऱ्यांविरोधात सातारा वनविभागाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत मसूर येथील महावीर सॉ मिलवर मोठा छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध बिगरपासी सागसाठा आढळून आला असून सॉ मिल थेट सील करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड आणि लाकूड साठा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कराड वनपरिक्षेत्र अंतर्गत मसूर परिमंडळात ही कारवाई करण्यात आली. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मसूर येथील महावीर सॉ मिलच्या आवारात अवैध सागवान साठवला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तत्काळ छापा टाकत सखोल तपासणी केली. तपासादरम्यान सॉ मिल परिसरात तब्बल ०.४२४ घनमीटर इमारती नगवड आणि ५.४८६ घनमीटर जळाऊ सागवान असा एकूण १२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

सदर सागसाठा हा कोणत्याही वैध परवान्याशिवाय म्हणजेच बिगरपासी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने तातडीने मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मसूर येथील सॉ मिल मालक संतोष भाऊ पाटील यांच्यावर वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. मा. उपवनसंरक्षक सातारा यांच्या आदेशान्वये संपूर्ण सॉ मिल सील करण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, फिरते पथक सातारा येथील वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपाल सुहास भोसले, फिरते पथकातील श्री. बोडके, वनरक्षक शितल पाटील, रोहन माने, रामचंद्र घुले व अश्विनी नागवे यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
वनसंपत्ती ही राज्याची अमूल्य संपत्ती असून तिच्या संरक्षणासाठी वनविभाग कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर साठा किंवा वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.
मसूर परिसरात झालेल्या या डॅशिंग कारवाईमुळे अवैध लाकूड व्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवायांची शक्यता वर्तवली जात आहे. वनमाफियांवर वनविभागाचा आता कराड तालुक्यात थेट ‘वॉच’ असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट झाले आहे.



