
(इम्तियाज मुजावर)….साताऱ्याच्या मातीला स्ट्रॉबेरीची ओळख देणारे ‘रसाळ बंधू’ – शेतकरीहिताची अखंड चळवळ
सातारा जिल्हा आज राज्यातच नव्हे तर देशपातळीवर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी ओळखला जातो, यामागे अनेकांचे योगदान असले तरी या वाटचालीचा कणा ठरलेली दोन नावे म्हणजे महेश रसाळ आणि उमेश रसाळ. कृषी मित्र ऍग्रो या संस्थेचे संस्थापक संचालक असलेले हे जुळे भाऊ म्हणजे केवळ उद्योजक नाहीत, तर स्ट्रॉबेरी पिकाचे जनक, शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आणि विश्वासाचे आधारस्तंभ आहेत.
तीन दशकांपूर्वी जेव्हा स्ट्रॉबेरी हे पीक फारसे परिचित नव्हते, तेव्हा रसाळ बंधूंनी परदेशातून दर्जेदार स्ट्रॉबेरी रोपे आणून सातारा जिल्ह्यात नव्या कृषी क्रांतीची बीजे रोवली.

महाबळेश्वर तालुका आज ‘स्ट्रॉबेरीची पंढरी’ म्हणून ओळखला जातो, पण या ओळखीमागे रसाळ बंधूंच्या अथक परिश्रमांची ठळक छाप आहे. त्यांनी केवळ पीक आणले नाही, तर ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास या सगळ्यांची जोड घातली.
कृषी मित्र ऍग्रोच्या माध्यमातून रसाळ बंधूंनी गेल्या २० ते ३० वर्षांत लाखो स्ट्रॉबेरी रोपे विविध देशांतून आणून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. आज १४ ते १५ विविध जातींची स्ट्रॉबेरी महाबळेश्वर परिसरात घेतली जाते, ही बाब त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे.

दर्जा, उत्पादनक्षमता आणि बाजारपेठेची मागणी यांचा समतोल साधत त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले.
महेश रसाळ आणि उमेश रसाळ यांची खरी ताकद म्हणजे शेतकऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते. “२४ तासांपैकी १८ तास शेतकऱ्यांसाठी” हे केवळ वाक्य नसून त्यांनी अंगीकारलेले व्रत आहे. पीक लागवड असो, रोग व्यवस्थापन असो, बाजारभाव असो किंवा अडचणींचा काळ – रसाळ बंधू नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांच्या हृदयसिंहासनावर त्यांचे नाव कोरले गेले आहे.

महेश रसाळ हे केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. सामाजिक कार्य, निवडणुका, शेतकरी प्रश्न, गरिबांचे दुःख – अशा प्रत्येक ठिकाणी ते धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी नेहमी मदतीचा हात पुढे करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. मैत्रीच्या दुनियेतील ‘राजा माणूस’ अशी ओळख त्यांनी आपल्या वागणुकीतून निर्माण केली आहे.
राजकीयदृष्ट्याही रसाळ बंधू स्पष्ट भूमिका ठेवणारे आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू मावळे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उदयनराजे भोसले यांच्या प्रत्येक सामाजिक व राजकीय वाटचालीत रसाळ बंधूंचा सहभाग नेहमी ठळक राहिला आहे. विश्वास, निष्ठा आणि कार्य यांचा संगम म्हणजे रसाळ बंधू अशीच त्यांची ओळख आहे.
आज महेश रसाळ आणि उमेश रसाळ यांचा वाढदिवस म्हणजे फक्त एक वैयक्तिक आनंदाचा क्षण नाही, तर सातारा जिल्ह्यातील हजारो स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो कृतज्ञतेचा दिवस आहे. त्यांनी उभ्या केलेल्या चळवळीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, ओळख आणि आत्मसन्मान मिळाला आहे.
साताऱ्याच्या मातीला गोडी देणारी स्ट्रॉबेरी आणि त्या गोडीमागे उभे असलेले रसाळ बंधू – ही जोडी म्हणजे परिश्रम, दूरदृष्टी आणि शेतकरीप्रेमाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!



