
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने हुमगाव–बावधन रस्त्याला गती; ग्रामीण विकासाला नवे बळ
हुमगाव–बावधन मार्गाला गती; ग्रामीण विकासाला नवे बळ
जावळी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या हुमगाव–बावधन मार्गाच्या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि विविध गावांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली. योग्य वेळ साधत बाबाराजे यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे निर्देश देत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रक्रिया वेगाने राबवण्याचे आदेश दिले.

या बैठकीत ग्रामीण मार्गाचे जिल्हा मार्गात रूपांतर, आवश्यक प्रशासकीय परवानग्या, तसेच वनक्षेत्राशी संबंधित बाबींचे निराकरण करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून रस्त्याच्या हक्क मार्गाबाबत कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. रोड अलाइनमेंट मॅप निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे हुमगाव–बावधन परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून स्थानिकांच्या दीर्घकालीन मागणीला मार्ग मोकळा झाला आहे.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद गट म्हसवे तसेच तालुक्यातील नेते वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी, गावचे प्रमुख आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यामुळे केवळ दळणवळण सुलभ होणार नाही तर ग्रामीण भागातील शेतमालाची वाहतूक, पर्यटन विकास आणि नव्या बाजारपेठांचा विस्तार यांना चालना मिळणार असल्याचे मत मानकुमरे यांनी व्यक्त केले.
यावेळी सौरभ बाबा, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप परामने, शिंदे गुरुजी, संतोष महामूलकर, बाळासाहेब निकम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच , विकास धोंडे आणि रणजीत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बाबाराजे यांच्या पुढाकारामुळे तालुक्यातील पर्यटनवाढ, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि स्थानिकांना नव्या रोजगार संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. रस्त्यामुळे दुर्गम भागातील गावांना मुख्य बाजारपेठांशी थेट जोडणी मिळेल, परिणामी वाहतूक खर्च कमी होऊन आर्थिक व्यवहारांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हुमगाव–बावधन मार्गाच्या कामाला प्रशासनाने वेग दिल्यास ग्रामीण भागातील विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे केवळ पायाभूत सुविधा मजबूत होणार नाहीत तर संपूर्ण तालुक्याच्या पर्यटन आणि आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळेल, अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.



