
हुमगाव (ता. जावळी) :
श्रावण मासातील पवित्र सोमवार… सकाळी पहाटेपासूनच श्री मेरुलिंग मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पुरातन आणि श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आज धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि घंटानादात वातावरण भारावून गेले. याच पार्श्वभूमीवर जावळी भाजपचे तालुकाध्यक्ष मा. संदीप परामणे यांनी पत्नीसमवेत उपस्थित राहून विधीवत रुद्राभिषेक केला.
पाण्याचा कलश, बेलपान, दुग्ध, धान्य आणि पंचामृताचा अभिषेक करताना मंदिरात एक वेगळाच आध्यात्मिक तेज झळकत होता. रुद्राभिषेकानंतर आराध्य दैवताच्या पायाशी माथा टेकवून श्री. परामणे यांनी आपल्या मनातील मनोकामना व्यक्त केल्या – “माझे नेते व माझे आराध्य दैवत मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचे आरोग्य उत्तम राहो. माझ्या जावळी तालुक्यातील बळीराजांच्या सर्व समस्या दूर होवोत, शेतकऱ्यांना दिलासा मिळो, त्यांचे संसार सुख-समृद्धीने नटलेले राहो, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे.”
या पवित्र विधीनंतर मंदिर परिसरात भक्तीभावाचा दरवळ अधिक पसरला. ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक व भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. रुद्राभिषेक संपल्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता आला.
श्रावणातील हा भावपूर्ण क्षण, केवळ धार्मिक विधी न राहता, बळीराजाच्या कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थनेचा दिवस ठरला.