शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरीचा दुसऱ्यांदा मानकरी – मानाची चांदीची गदा व स्कर्पिओ जिंकली
धाराशिव –
शिवराज राक्षे हा 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे ( गादी गट ) या दोघात अंतीम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्याने जखमी झाला, नंतर तो त्याच जोशाने मैदानात उतरला. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा मानकरी ठरला, ते पुण्यातील असुन नांदेड कडुन प्रतिनिधित्व करतात.
धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली.आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
माती गटातून गणेश जगताप 2 गुण व हर्षवर्धन सदगीर 6 गुण अशी लढत होऊन हर्षवर्धन विजयी झाला तर गादी गटात कुस्ती शिवराज राक्षे 10 गुण व पृथ्वीराज मोहोळ 0 अशी एकतर्फी झाली त्यात राक्षे विजयी झाला.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालीम संघ. व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजन केले होते. सुधीर पाटील, अभिराम पाटील व आदित्य पाटील यांनी यात मोलाची भुमिका बजावली.