
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील ज्युदोपटू कुमारी साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 जाहीर झाला असून, ही बाब संपूर्ण पोलिस दलासाठी अभिमानास्पद आहे. उत्कृष्ट मेहनत, जिद्द आणि सातत्य याच्या जोरावर साक्षीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उज्वल केले आहे.
सन 2024 मध्ये तुर्कस्तान-कझाकिस्तान येथे झालेल्या वर्ल्ड डेफ ज्युदो चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले कास्यपदक मिळवून देणारी साक्षी, त्याचबरोबर मलेशियात 01 ते 08 डिसेंबर 2024 दरम्यान झालेल्या 10व्या एशियन पॅसिफिक डेफ गेम्समध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून आली आहे.
या उल्लेखनीय यशामागे प्रबोधिनीतील प्रशिक्षक पोकॉ/1793 दत्ता भोसले (NIS ज्युदो प्रशिक्षक) व मपोकॉ/756 स्वाती जाधव यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रबोधिनी व्यवस्थापक श्री. सुनिल सपकाळ, सहा. व्यवस्थापक सॅम्युअल भोरे, आणि प्रशिक्षकांनी साक्षीला घडवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन.
साक्षीच्या यशाबद्दल पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. अतुल सबनीस, राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजू शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनिल चिखले यांनी साक्षीचे तसेच संपूर्ण प्रबोधिनीचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
साक्षी बनसोडेचे यश हे फक्त वैयक्तिक विजय नसून, महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्य आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे!