शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गुरुचरणी कृतज्ञतेचा सागर; गुरुपौर्णिमेला श्रद्धा, संस्कार आणि सन्मानाचा भव्य सोहळा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंचा भावपूर्ण सन्मान; पालपेणेतील कार्यक्रमात आदर, संस्कार आणि प्रेरणेचा संगम

पालपेणे (ता. गुहागर) : जनसेवा एज्युकेशन सोसायटी, पालपेणे संचलित वरदान न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, दहिवली खरवते येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत गुरुजनांचा सन्मान करून गुरुपौर्णिमेच्या परंपरेला आधुनिक संस्कारांची जोड दिली.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन वैद्य मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांनी भावगीत, समूहगीत आणि प्रभावी भाषणांद्वारे गुरुंच्या ऋणांची जाणीव उपस्थितांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर 8वी, 9वी व 10वी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या आशिर्वादांची प्राप्ती केली.

या कार्यक्रमास वरदान न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. हासबे सर, श्री. मोहिते सर, श्री. घुटुकडे सर, श्री. कळेकर सर, श्री. फिलसे सर, तसेच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयातून आलेल्या प्रमुख विद्यार्थ्यांमध्ये असीम मुजावर, सुजित पवार, यशराज भोसले, प्रेम ससाणे, स्वयम दळी, विजय ढेरे, यांचा समावेश होता.

मुख्याध्यापक हासबे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गुरू म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे, तर आयुष्याला दिशा देणारे दीपस्तंभ असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि उज्वल भवितव्याची पायाभरणी होते.”

विजय ढेरे याने गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. तर इतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना भेटवस्तू देत कृतज्ञतेची सुंदर अभिव्यक्ती केली.

गुरुंच्या सान्निध्यात संस्कार, निष्ठा आणि प्रेरणा यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंबद्दल अधिक सन्मान आणि आदर निर्माण करणारा ठरला.

गुरु म्हणजे ज्ञानाचे दान देणारे, अंधारातून उजेडाकडे घेऊन जाणारे खरे जीवनमार्गदर्शक असतात – हेच या कार्यक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!