वनवा लावणाऱ्याला वनविभागाचा दणका; अंभेरीतील आरोपी जेरबंद


वनवा लावणाऱ्याला वनविभागाचा दणका; अंभेरीतील आरोपी जेरबंद
सातारा :
कोरेगाव तालुक्यातील अंभेरी येथील वनक्षेत्रात वनवा लावून मोठे नुकसान करणाऱ्या आरोपीला वनविभागाने तत्पर कारवाई करत जेरबंद केले आहे. वनविभागाच्या या डॅशिंग कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्र कोरेगाव अंतर्गत मौजे अंभेरी येथील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांक २१६ मधील वनक्षेत्रात दि. ४ मार्च २०२६ रोजी वनवा लावल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत सुमारे १० हेक्टर वनक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेत वनवा आटोक्यात आणला.
या प्रकरणी गणेश राजाराम जातक (रा. अंभेरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्यावर प्र.गु.रि.क्र. ०१/२०२६ अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) (ब) (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यासाठी एक वर्षांपर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, अवैध वाहतूक, राखीव वनात अतिक्रमण किंवा वनवा लावणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे, वनपाल शिवाजी लटके व वनरक्षक रानबा बिक्कड यांनी केली. वनविभागाच्या या तत्पर आणि डॅशिंग कारवाईचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!