
राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचा दमदार जलवा
महिला संघ विजेता; पुरुष संघ उपविजेता, ३२ पदकांची कमाई
जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या ४५ व्या राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ३२ पदके मिळवली. या स्पर्धेत देशभरातून सुमारे २२०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या यशानंतर विजेते खेळाडूंचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी डी.वाय.एस.पी. अनिल पवार यांच्या हस्ते सर्व विजेते खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुरुष गटातील विजेते खेळाडू :
वय वर्षे ३५ गटात मुकेश कोळी यांनी ५ कि.मी. चालणे स्पर्धेत ३५.३५.९७ सेकंद वेळेसह प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ४x१०० मीटर रिले धावणे, ५००० मीटर धावणे आणि ८०० मीटर धावणे या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
वय वर्षे ४० गटात राकेश दिसले यांनी ४x१०० मीटर रिले धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
वय वर्षे ४५ गटात अविनाश भंडारे यांनी २०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ४x१०० मीटर रिले धावणे स्पर्धेत द्वितीय आणि ४x४०० मीटर रिले धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. मनोज दिसले यांनी ४x१०० मीटर रिले धावणे स्पर्धेत द्वितीय व ४x४०० मीटर रिले धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. उमेश पाटील यांनी ४०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला, तर ४x४०० मीटर रिले धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
वय वर्षे ५० गटात संजय शिंदे यांनी ५००० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
वय वर्षे ५५ गटात राम जागडे यांनी ४०० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला.
वय वर्षे ६० गटात रवींद्र बोऱ्हाडे यांनी बांबू उडी स्पर्धेत १.७० मीटर उडी मारत द्वितीय क्रमांक पटकावला.
महिला गटातील विजेते खेळाडू :
वय वर्षे ३० गटात दिपाली गायकवाड यांनी ४x१०० मीटर रिले धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १०० मीटर आणि २०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर लांब उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
वय वर्षे ५० गटात रेवती मोरे यांनी थाळी फेक आणि गोळा फेक या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली.
वय वर्षे ५५ गटात स्मिता सकपाळ यांनी ४x१०० मीटर रिले धावणे, ८०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे आणि १५०० मीटर धावणे या चार स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
वय वर्षे ६५ गटात संगीता खंडागळे यांनी गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, तर ३००० मीटर चालणे आणि ८०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
वय वर्षे ७० गटात सरस्वती साबळे यांनी ४x१०० मीटर रिले धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १००० मीटर चालणे स्पर्धेत द्वितीय आणि गोळा फेक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या मास्टर्स खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.



