राजकारणातील घराणेशाहीला पूर्णविराम देण्याची हीच खरी वेळ! मतदारांच्या विश्वासावरच कुडाळ गणाचा विकास घडवणार – प्रशांत तरडे

राजकारणातील घराणेशाहीला पूर्णविराम; मतदारांच्या विश्वासावरच कुडाळ गणाचा विकास घडवणार – प्रशांत तरडे
कुडाळ प्रतिनिधी :
कुडाळ गणातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार करत राजकारणातील घराणेशाहीला कायमचा आळा घालून सामान्य मतदारांच्या विश्वासास पात्र ठरणार, असा ठाम शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत तरडे यांनी दिला आहे. सोनगाव व सर्जापूर येथे झालेल्या जोरदार प्रचार रॅलीदरम्यान त्यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत मतदारांना विश्वास दिला.
प्रशांत तरडे म्हणाले, “मी कधीही केवळ राजकारणासाठी राजकारण केले नाही. समाजकारण हाच माझा केंद्रबिंदू असून कुडाळ गणाचा सर्वांगीण विकास हेच माझे एकमेव ध्येय आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, कारण लोकांना आता काम करणारा, गावात राहणारा आणि लोकांमध्ये मिसळणारा प्रतिनिधी हवा आहे.”
ते पुढे म्हणाले, “लोकांच्या प्रश्नांवर फक्त भाषणं करणारे नाही, तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व कुडाळ गणाला हवे आहे. मी मतदारांच्या आशीर्वादावर आणि पाठबळावर ही वाटचाल सुरू ठेवली आहे. विकासाचे नवे पर्व उभे करायचे असेल, तर घराणेशाही थांबलीच पाहिजे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या अडचणींवर उभा राहणारा प्रतिनिधी म्हणून मी कायम कार्यरत राहीन.”
कुडाळ गणातील समस्या, पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा प्रत्येक मुद्द्यांची सखोल जाण असल्याचे सांगत तरडे म्हणाले की, “सर्वसामान्य माणूस हा माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समस्या मला माहीत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र झटणार आहे. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर कायम जनतेसोबत राहणारा प्रतिनिधी देण्याची ही लढाई आहे.”
दरम्यान, सोनगाव आणि सर्जापूर येथे प्रशांत तरडे यांनी भव्य प्रचार फेरी काढली. या प्रचारात सोनगाव, सर्जापूर, पु. पानस, गोपाळपंताची वाडी, काळेवाडी, डबडेवाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गावागावातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेचा विश्वास दर्शवणारा असल्याचे चित्र दिसून आले.
ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रशांत तरडे हे युवकांचे खंबीर आणि विश्वासार्ह नेतृत्व आहे. त्यामुळे कुडाळ गणातील प्रत्येक गावात युवकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना मिळत आहे. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गही प्रचारात सक्रिय सहभाग घेत असल्याचे दिसून आले.
प्रचारादरम्यान प्रशांत तरडे यांनी सोनगाव आणि सर्जापूरमधील स्थानिक समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी ही लढाई आहे,” असे ठणकावून सांगत त्यांनी कुडाळ गणात बदल अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!