
म्हसवे पंचायत समिती गणासाठी पुन्हा अरुणा अजय शिर्केंचीच जोरदार मागणी
कुडाळ(प्रतिनिधी)…म्हसवे पंचायत समिती गणासाठी माजी सभापती सौ. अरुणा अजय शिर्के यांना पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग आणि कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रदीर्घ राजकीय अनुभव, प्रभावी वक्तृत्व, प्रशासनावरची पकड आणि विकासाभिमुख कामगिरी यामुळे सौ. अरुणा शिर्के या म्हसवे जिल्हा परिषद गटातील एक सक्षम, विश्वासार्ह आणि जनमानसात रुजलेलं नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.
पंचायत समिती सभापती पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून विकासकामांचा झपाटा लावला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, स्वच्छता अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर त्यांनी प्रभावी कामगिरी केली. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे म्हसवे जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती म्हसवे गणात मार्गी लावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या आणि त्यांच्या विचारांवर कायमस्वरूपी राजकारण करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून सौ. अरुणा शिर्के यांची ओळख आहे. ‘बाबाराजे’ यांच्या नेतृत्वावरची निष्ठा ही केवळ राजकीय नसून, ती विकास आणि सर्वसामान्यांच्या हितासाठीची बांधिलकी असल्याचं त्यांच्या कामातून वारंवार दिसून आलं आहे. वेळप्रसंगी महिलांच्या प्रश्नांसाठी त्या थेट रस्त्यावर उतरल्या, आंदोलन केलं आणि संबंधित प्रश्नांना वाचा फोडली.
महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणं, ही सौ. अरुणा शिर्केंची खास ओळख ठरली आहे. महिला संघटन, बचत गट, युवा कार्यकर्ते, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याशी त्यांचा थेट संवाद आहे. प्रत्येकाला आपलंसं करणारी नेतृत्वशैली, स्पष्ट भूमिका आणि निर्भीड वक्तृत्व यामुळे त्या सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय आहेत.
म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये म्हसवे पंचायत समिती गण हा म्हसवे गाव वडाचे म्हसवे म्हणून ओळखला जातो. या गावाचं मतदान निर्णायक असून, याच गावाच्या निर्णयावर पंचायत समिती गणाचा उमेदवार ठरतो, हे राजकीय वास्तव आहे. त्यामुळे “म्हसवे गणात म्हसवे गावचाच हक्काचा उमेदवार द्यावा” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सौ. अरुणा अजय शिर्के यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही, अशी ठाम भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रदीर्घ राजकीय अनुभव, प्रभावी वक्तृत्व कौशल्य, प्रशासनाची जाण, विकासाची ठोस कामगिरी आणि बाबाराजे यांच्यावरची अढळ निष्ठा—या सर्व शिदोरीच्या जोरावर पुन्हा एकदा माजी सभापती सौ. अरुणा अजय शिर्के यांनाच पंचायत समितीसाठी उमेदवारी द्यावी, हीच सर्वसामान्यांची एकमुखी भावना बनत चालली आहे. राजकीय पक्षांनीही या जनभावनेची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आता उघडपणे व्यक्त होत आहे.



