म्हसवे गटात कमळ फुललं; पण नेत्यांच्या गावातच ‘बाणाचे’ घाव!मतपेटीतून उघड झालं गावपुढाऱ्यांचं पितळ, पडलं उघडं! नेत्यांच्या विश्वासाला तडा, की, भाकरी पालटण्याची वेळ?

इम्तियाज मुजावर स्पेशल रिपोर्ट

जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटाची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही लढत लढवली, तर शिवसेनेचे संदीप पवार यांनी काट्याची टक्कर दिली. अखेर निकालात मानकुंमरे यांना ९८९८ मते मिळाली आणि संदीप पवार यांचा अवघ्या २२०० मतांनी पराभव झाला. कागदोपत्री हा विजय असला तरी मतपेटी उघडताच अनेक नेत्यांच्या गावातील आकडे पाहून भाजप पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ज्या गावांतून “सगळं पॅक आहे” अशी हमी दिली जात होती, त्याच गावांनी वेगळाच कौल दिला.
निवडणुकीच्या प्रचारात अनेक गावपुढारी, माजी पदाधिकारी, साखर कारखान्याचे संचालक, पंचायत समिती सभापती, सरपंच परिषद नेते व्यासपीठावर खुर्च्या लावून बसत होते. “बाबा, दादा, भाऊ, अण्णा… काळजी करू नका, गाव शंभर टक्के तुमचंच!” अशा विश्वासाच्या घोषणा होत होत्या. पण निकालाने दाखवून दिलं की मतदारांनी कोणालाही गृहीत धरले नाही.


खर्शी बारामुरे : विश्वासाला पहिला धक्का
खर्शी बारामुरे या गावात शिवसेनेचे संदीप पवार यांना ३३७ मते मिळाली, तर वसंतराव मानकुंबरे यांना अवघी ३१० मते. म्हणजेच २७ मतांची आघाडी शिवसेनेला. हेच ते गाव, जिथे भाजपचे माजी उपसभापती दत्ता गावडे आणि माजी उपसभापती हनुमंतराव पार्टे यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होते. व्यासपीठावरून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या या गावानेच भाजपला धक्का दिला. “माझं गाव, माझा परिसर ताकदीचा आहे,” अशी खात्री देणाऱ्यांच्या गावातूनच विरोधी उमेदवाराला जास्त मते मिळाल्याने चर्चा रंगली आहे.


आंबेकर तर्फे कुडाळ : हक्काच्या गावात १०० मतांची आघाडी
आंबेकर तर्फे कुडाळ येथे शिवसेनेला तब्बल १०० मतांची आघाडी मिळाली. हे गाव मानकुंमरे यांचं ‘हक्काचं’ मानलं जात होतं. विकासकामांची यादी मोठी असतानाही मतदारांनी वेगळा कौल दिला. “कोट्यवधींचा विकास झाला,” असे व्यासपीठावर सांगणाऱ्या नेत्यांना मतपेटीने वेगळंच उत्तर दिलं.


हातगेघर : सबका साथ, पण गावात साथ कमी?
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली. ‘सबका साथ, सबका विकास’ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातच २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. गावपातळीवर मतदारांमध्ये नाराजी होती का, की स्थानिक पातळीवरील गटबाजी कारणीभूत ठरली? याचा उहापोह सुरू आहे.


वडाचे म्हसवे : माजी सभापतींच्याच गावात १०० मतांची तूट
सर्वात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वडाचे म्हसवे गावात जावळी पंचायत समितीच्या माजीसभापती अरुणा शिर्के आणि त्यांचे पती अजय शिर्के हे मानकुंबरे यांच्या प्रत्येक सभेत उपस्थित होते. मात्र त्यांच्याच गावात मानकुंबरे यांना शिवसेनेपेक्षा शंभर मते कमी पडली. तब्बल ५८० मते विरोधात गेली. माजी सभापतींच्या गावातच अशी स्थिती निर्माण झाल्याने “नेमकं चुकलं कुठे?” असा सवाल उपस्थित झाला आहे.


शशिकांत शिंदे यांचे गाव : विरोधात १५८ मते
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गावात मानकुंबरे यांना १५८ मते मिळाली. म्हणजेच त्या गावातही सुमारे १५० मतदार विरोधी गटाचे असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय समीकरणे किती गुंतागुंतीची आहेत, याचे हे उदाहरण मानले जात आहे.
वालुथ : विकासाच्या दाव्यांना मतपेटीचं उत्तर
सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोपळे यांच्या वालुथ गावात मानकुंबरे यांना ३१३ मते, तर शिवसेनेला २९० मते मिळाली. स्वतः पोपळे उमेदवार असूनही त्यांच्या गावात २९० मते विरोधात गेली आणि ते पराभूत झाले. “कोट्यवधींचा विकास झाला,” असा दावा करणाऱ्या गावातच इतकी मते विरोधात गेल्याने विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


करंदी तर्फे कुडाळ : दिग्गजांचा प्रभाव कमी?
करंदी तर्फे कुडाळ येथे २७८ मते शिवसेनेला मिळाली. प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम यांच्यासह अनेक दिग्गज नेते या गावात सक्रिय असतानाही विरोधात मोठी मते गेली. विकासकामांबाबत मतदारांमध्ये भ्रमनिरास झाला का, यावर चर्चा सुरू आहे.
करंदोशी : १८१ मते विरोधात
करंदोशी गावात भाजपचे मोठे नेते सक्रिय असूनही १८१ मते विरोधी उमेदवाराला मिळाली. महाराज साहेब आल्यानंतर मागेपुढे करणारे कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष मतदानातील चित्र यात तफावत दिसून आली.
विकास विरुद्ध विश्वास?
म्हसवे गटात कमळ फुललं असलं तरी शिवसेनेच्या ‘बाणाचे’ घाव वर्मी लागल्याची कबुली भाजप कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळते. मतदारांना गृहीत धरल्यास काय परिणाम होतो, हे ईव्हीएममधून स्पष्ट झालं. “समंद पॅक आहे” म्हणणाऱ्यांच्या गावातूनच विरोधात मते गेल्याने आता अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.
दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा सवाल
निकालानंतर दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. “गावपुढाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. बूथनिहाय संघटन मजबूत करावी लागेल,” अशी चर्चा सुरू आहे. काही जण तर “भाकरी पालटण्याची वेळ आली का?” असा सवालही उपस्थित करत आहेत.


निसटता विजय, मोठा संदेश
मानकुंमरे यांचा विजय झाला असला तरी मताधिक्य अपेक्षेपेक्षा कमी राहिलं. अनेक गावांतून मिळालेल्या विरोधी मतांनी स्पष्ट केलं की स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि अति आत्मविश्वास यांचा फटका बसू शकतो. निवडणूक म्हणजे केवळ व्यासपीठावरील घोषणांचा खेळ नाही, तर बूथपातळीवरील काटेकोर काम महत्त्वाचं असतं. आखाडे गावामध्ये भाजपचे पाच दशक कार्यकर्ते आणि कट्टर भाजप प्रेमी म्हणून ओळखले जाणारे उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सयाजीराव शिंदे यांच्या आखाडे गावात 384 मतं भाजपच्या विरोधात गेली त्यामुळे प्रत्येक भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणारे कायमस्वरूपी भाजपचे प्रचारक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्याच गावात 384 मतं विरोधात गेल्याने कार्यपद्धतीवर व 384 मते विरोधात गेल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचार करायला लावणारा हा निकाल गावातला असल्याचे बोलले जात आहे


आता पुढे काय?
या निकालाने भाजपसमोर संघटनात्मक पुनर्रचनेचं आव्हान उभं केलं आहे. गावपुढाऱ्यांवर विसंबून राहण्याऐवजी मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची तत्काळ सोडवणूक आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा पुढील निवडणुकांत परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते.
म्हसवे गटातील हा निकाल केवळ एका उमेदवाराचा विजय-पराभव नाही, तर तो स्थानिक राजकारणाला मिळालेला धडा आहे. मतदारांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे — विकासाच्या दाव्यांपेक्षा विश्वास आणि प्रत्यक्ष काम महत्त्वाचं. व्यासपीठावरच्या लाडू-जिलेबी, लाल-निळ्या सरबतातील गोडवा मतपेटीत टिकत नाही; तिथे टिकतो तो केवळ जनतेचा खरा विश्वास.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!