मेढ्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक बैठक
सार्वजनिक मंडळांना सीसीटीव्ही, डॉल्बी बंदी, सुरक्षिततेच्या काटेकोर सूचना
मेढा (ता. जावळी) : गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर आज 13 ऑगस्ट रोजी मेढा पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य व पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक कलश मंगल कार्यालय, मेढा येथे घेण्यात आली.
ही बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी वाई मा. बाळासाहेब भालचिम व मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बैठकीत गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे बंधनकारक, विसर्जन मिरवणूक वेळेत काढणे, सर्व मंडळांनी सीसीटीव्ही बसवणे, डॉल्बीला बंदी घालून केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, मंडप बांधणीत पत्र्याचा वापर करणे, इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट टाळण्यासाठी महावितरणचे प्रमाणपत्र घेणे, तसेच देखावे समाजिक व कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

बैठकीला अंदाजे 175 ते 200 गणेश मंडळ प्रतिनिधी, पोलीस पाटील आणि शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांच्या या स्पष्ट इशाऱ्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत, सुरक्षित आणि पारंपरिक वातावरणात साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
