माय माऊली मराठी भाषेला मना पासून जपले पाहिजे – न्यायाधीश डॉक्टर श्री विक्रम अंबादास आव्हाड.

मेढा: मा. ना. सर्वोच्च न्यायालय मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांच्या व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आदेशानुसार मराठी भाषा गौरव दिन निमित्त कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन न्या. डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा बिभवी येथे संपन्न झाले .

शाळा मराठी माझी शाळा मराठी वं
जशी लेकरा माय, धरतीया पोटी वं
शाळा मराठी माझी शाळा मराठी वं
जशी लेकरा माय, धरतीया पोटी वं
आज खऱ्या अर्थाने या कवितेला साजेसा मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम बिभवी शाळेत संपन्न झाला.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजले बियाणे माळा राणी खडकात
खरं तर मराठी भाषेला रुजवायचं झालेच तर त्याची सुरूवात अगदी मराठी शाळेतूनच होते आणि खरं तर तिथे मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या कवींचा, लेखकानंचा उदय मराठी शाळेतून होतो. कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जाणारा हा दिवस. त्यांच्या कार्याला, त्यांच्या लिखाणाला व त्यांच्या असणाऱ्या मराठी भाषे बद्दलच्या अती उच्च प्रेमा बद्दल आणि त्यांच्या मराठी भाषेला दिलेल्या समर्पणा बद्दल हा दिवस त्यांची आठवण म्हणून साजरा केला जातो.

खरं तर कुसुमाग्रज यांच्या या टोपण नावा बद्दल एक गोष्ट आहे. कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते. आपल्या बहिणीच्या बद्दल अतीव प्रेमा बद्दल त्यांनी आपल्या बहिणीचे नाव कुसुम व अग्रज म्हणजे आपल्या धाकट्या लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज हे नाव मराठीतील थोर कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांनी टोपण नावं धारण केले. ते एक श्रेष्ठ कवी, नाटककार आणि कादंबरीकार होते, ज्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आणि माणुसकीसाठी लेखन केले. त्यांचे गाजलेले नाटक नटसम्राट व गाजलेला कविता संग्रह विशाखा या बद्दल मराठी भाषेतील अतीउच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खरं तर हा मराठी भाषेचा सन्मान होता. त्यामुळे आज सर्व जण हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात.
बिभवी शाळेमध्ये हा दिवस उत्सव म्हणून साजरा करण्यात आला या शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक लकडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. आपल्या सूत्रसंचालनाने व उत्कृष्ट अशा प्रभावी शब्द संपादेने त्यांनी सर्वांना मोहित करून ठेवले. सुरूवातीला जावली तालुका वकील संघा च्या सदस्या श्रीमती एन एस पवार यांनी कुसुमाग्रज यांच्या बद्दल अभ्यासपूर्ण व त्यांच्या वाचन संपदेतून तयार झालेल्या कुसुमाग्रज यांच्या आठवणी व त्याच्या कवितांना त्यांनी उजाळा दिला. श्रीमती ए के शेटे यांनी मुलांना त्यांच्या रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दात अडकवून त्यांना मराठी भाषेतील समान शब्दांची ओळख करून दिली व ते शब्द दररोज वापरले पाहिजेत असे समजावून सांगितले. तसेच मराठी भाषेचे अवचित्य साधून जावली तालुक्यातील ज्येष्ठ कवी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षिका सौ जयश्री माजगावकर ताई यांनी मुलांना नवीन उभारते लेखक, कवी यांच्या बद्दल मार्गदर्शन केले व जास्त अभ्यासाचे ओझे मनावर न घेता व्यक्त झाले पाहिजे. आपल्या मनातील भावनांना शब्दाद्वारे मार्ग दाखवले पाहिजेत. त्यामुळे आपले मन प्रसन्न राहून होणाऱ्या संभाव्य धोक्या पासून स्वतःला व घरच्याना वाचवता येते, असे प्रतिपादन केले. आपल्या मराठी भाषेचा पतंग आकाशात दिमाखात दिसतो असेही त्यांनी म्हटले. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड यांनी मुलांना मराठी भाषा व संस्कार, ते कसे झाले पाहिजेत. किंबहुना ते कसे केले गेले पाहिजेत. मुळात किंतु, परंतु किंबहुना हे शब्द किती महत्वाचे आहेत आणि कायद्यात याला किती महत्व आहे, हे मुलांना पटवून दिले. त्याची सुरूवात त्यांनी स्वतःच्या मुला पासून कशी केली हे ही मुलांना सांगितले. खरे तर नुसता उपदेश सर्वच जण करतात पण त्याची अंमलबजावणी स्वतः आपल्या मुला पासून करून एक प्रकारचा आदर्श त्यांनी सर्वांन समोर ठेवला. मराठी भाषा ही २४०० वर्ष जुनी प्राकृत म्हणजे मराठी ही सर्व बोली भाषांची जननी आहे. माय बोली माय मराठी आहे, असे म्हटले. जसे कस्तुरी मृग हा स्वतःच्या बेंबीत असणाऱ्या सुगंधाच्या शोधत सगळीकडे फिरत असतो. त्याच पद्धतीने आपणही करत आहोत. आपली माय मराठी भाषा ही सर्व श्रेष्ठ व सर्वगुण संपन्न असून. तिचे अनेक पैलू आहेत. ज्याचा सविस्तर अभ्यास करायचा झालाच, तर आपले संपूर्ण जीवन पुरणार नाही. तसेच मराठी भाषे बद्दल त्यांचे प्रेम एवढे आहे की त्यांनी मराठी भाषेबद्दल प्रसिद्ध असलेल्या कवितेतील चार ओळी म्हटल्या व आपल्या भाषणाचा समारोप केला त्या ओळी पुढील प्रमाणे
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”
“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी”
“जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी”
“धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी”
“एवढ्या जगात माय मानतो मराठी”
“आमुच्या मनामनात दंगते मराठी”
“आमुच्या रगारगात रंगते मराठी”
“आमुच्या उराउरात स्पंदते मराठी”
कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शनाचे गोड काम त्याच शाळेतील उत्कृष्ट शिक्षिका सौ दुंदळे मॅडम यांनी केले त्यांनी समारोप करताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि गोडवा सांगताना ज्ञानेश्वरीत काय म्हटले आहे हे अगदी संपूर्ण अर्था सहित सांगितले…
“माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिकें। मेळवीन॥”
अर्थ: माझी मराठी भाषा अत्यंत कौतुकपूर्ण आहे, ती अमृतापेक्षाही गोड आहे (अमृतालाही पैज लावून जिंकेल). मी मराठी भाषेत रसिक लोकांना आनंद देणारी अशी सुंदर अक्षरे (शब्द) गुंफून ज्ञानेश्वरी रचली आहे.
या कार्यक्रमास जावली तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्री विक्रम अंबादास आव्हाड आव्हाड तसेच ॲड.एन.एस.पवार,ॲड.ए.के.शेटे,, कवयित्री जयश्री माजगांवकर,बिभवीचे सरपंच संतोष बांदल,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संदीप देशमुख, मुख्याध्यापक अशोक लकडे. या कार्यक्रमास विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी ही उपस्थित होते. त्यांच्या सह सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!