
कुडाळ (ता. …): पंचायत समिती कुडाळ गणातील भाजपचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या प्रचारार्थ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कुडाळचे आमदार नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथे समस्त मुस्लिम समाजाशी थेट संवाद साधला. या संवादातून विकास, विश्वास आणि भावनिक नाते अधोरेखित झाले असून, कुडाळमधील मुस्लिम समाज सौरभ शिंदे यांच्या विजयासाठी एकवटल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.
यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अत्यंत भावनिक आणि ठाम शब्दांत सांगितले की, “माझ्या कामाची खरी पोचपावती काय असेल, तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माझ्यापेक्षा एक टक्का का होईना, पण सौरभ शिंदे यांना अधिक मतदान मिळाले पाहिजे.” या वक्तव्याला उपस्थित समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष साबिर भाई पठाण नसीर डांगे, समीर भाई आतार ,अल्ताफ आतार, सादिक भाई शेख ,जुबेर शेख ,वसीम शेख ,मोहसीन शेख, सलीम भाई आतार ,अशपाक भाई आतार, समीर शेख, या सहसेकडून मुस्लिम बांधव उपस्थित होते

विरोधकांवर थेट सवाल उपस्थित करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “विरोधी उमेदवाराने कुडाळमध्ये आजवर किती रुपयांचा निधी आणला आहे? कोणती ठोस विकासकामे केली आहेत? हे प्रश्न जनतेने विचारले पाहिजेत.” केवळ व्यक्तिद्वेषातून राजकारण करणारे लोक कोणाचाही विश्वास संपादन करू शकत नाहीत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
भाजप आणि मुस्लिम समाजाबाबत पसरवण्यात येणाऱ्या गैरसमजांवरही त्यांनी ठाम शब्दांत भाष्य केले. “भाजप पक्ष कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हता आणि नसणार नाही. राज्य सरकार कायम मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे आहे,” असे सांगत त्यांनी राज्यभरात दफनभूमी, कब्रस्तान विकास, मूलभूत सुविधा तसेच मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख केला.
सौरभ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “सौरभ शिंदे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे नेतृत्व आहे. त्यांना माझ्यापेक्षा एक टक्का अधिक प्रेम द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
या सभेत मुस्लिम समाजातील मान्यवर, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि विकासाच्या ठोस मुद्द्यांमुळे सौरभ शिंदे यांच्या विजयासाठी संपूर्ण समाज एकदिलाने उभा असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. कुडाळ पंचायत समिती गणातील ही भेट निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



