
(महाबळेश्वर) महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी अजित संकपाळ, तळदेव गणातून संजय शेलार, तर वाढा–कुंभरोशी गणातून संजय मोरे यांनी महाबळेश्वर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केले.
निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज छाननीअंती स्वीकारले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मगाव दरे आणि कांदाट खोऱ्यातून शिवसेनेने आपले शिलेदार मैदानात उतरवले असून, त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदाट खोऱ्यात केलेला चौफेर विकास आणि कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी हीच शिवसेना उमेदवारांची मोठी ताकद मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर शहरातील आराम चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
रॅलीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उमेदवारी अर्ज दाखल करताना महाबळेश्वर तहसील कार्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



