
–
कासवंडमध्ये शेतात खुलेआम कचरा फेक – पंचायतीचे मौन, पर्यावरणाचा घात!
महाबळेश्वर तालुका | प्रतिनिधी
कासवंड हद्दीतील झोळी येथे 1 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता विकास पवार यांच्या शेतात खुलेआम कचरा फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिनकर शंकर उंबरकर ही व्यक्ती कचरा टाकताना रंगेहाथ आढळली. ही बाब तत्काळ सरपंच जनार्दन आनंदा चोरमले यांना कळवूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, ही धक्कादायक बाब आहे.

विकास रखमाजी पवार यांनी संताप व्यक्त करत, “निसर्गाचे वरदान लाभलेला कासवंड परिसर पाचगणी–भोसे–भिलार येथील काही हॉटेल व्यवसायिकांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे हळूहळू कचऱ्याच्या विळख्यात सापडत आहे. ओढ्यांत व शेतशिवारात कचरा टाकून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास केला जात आहे. त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली.

या प्रकाराविरुद्ध संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसेच आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करून दोषींवर दंडात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा पुढील काळात नागरिकांच्या आरोग्यावर व निसर्गाच्या समतोलावर गंभीर परिणाम होईल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे मौन प्रश्नांकित करत, “पर्यावरण संरक्षणासाठी जाहीर घोषणा करणारं सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था, प्रत्यक्ष कृतीत कुठे आहेत?” असा सवाल उपस्थित केला आहे.