महाबळेश्वरमध्ये शिकाऱ्यांवर सातारा वन विभागचा कडक दणका: गाडी जप्त, आरोपी ताब्यात!

सातारा प्रतिनिधी (इम्तियाज मुजावर )सांडपाणी मोहिमेनंतर वनविभागाचा शिकाऱ्यांना दणका
रानडुक्कर शिकार प्रकरणी गाडी जप्त; दोन आरोपी ताब्यात
महाबळेश्वर परिसरात वन्यजीव संरक्षणासाठी सुरू असलेल्या कारवायांना वेग आला असून वनविभागाने रानडुक्कर शिकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळेश्वर येथील मधुसागर राईड परिसरात गस्त घालत असताना वनअधिकाऱ्यांनी दोन आरोपींना रंगेहात पकडले.
वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे व वनरक्षक तुकाराम निकम यांच्या पथकाने संशयित हालचालींची पडताळणी केली असता, वन्यप्राणी रानडुक्कराची शिकार करून ती वाहनातून नेत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी आरोपी संजय लक्ष्मण गोळे आणि अजय महादेव कोंढाळकर (रा. लिंगमळा, ता. महाबळेश्वर) यांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली मारुती ओमनी (MH-08-R-0663) जप्त करण्यात आली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती वनविभागाने दिली.
भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणी १ ते ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले. सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ व वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असून पुढील तपास सुरू आहे.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांची शिकार करणे, त्यांना त्रास देणे, वनक्षेत्रात कचरा टाकणे किंवा सांडपाणी सोडणे हे कायद्याने दंडनीय आहे. अशा प्रकारांची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले.
वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षणासाठी वनविभाग सातत्याने कार्यरत असून अशा कारवायांमुळे कायद्याचे पालन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होत असल्याचे नागरिकांतून व्यक्त होत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!