भुईंज गावातील सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी गैरव्यवहाराशी आमचा संबंध नाही .विद्यमान महिला ग्रामपंचायत सदस्यांची पत्रकार परिषदेत माहिती(व्हिडीओ)

भुईंज : भुईंज ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी गैरव्यवहाराशी आम्हा महिला सदस्यांचा कोणताही संबंध नाही. या व्यवहाराची महिला सदस्यांना कधीच स्पष्ट कल्पना दिली नाही. याबाबत मागणी करुनही या प्रकरणाची माहिती देण्यात आली नाही. या उलट या व्यवहारात जे ग्रामपंचायतीचे, ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे ते वसुल करावे यासाठी आपण आग्रही आहोत, अशी माहिती भुईंज ग्रामपंचायतीमधील दोन्ही गटांच्या महिला सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत बोलताना सदस्या सौ. प्राजक्ता विनय जाधव म्हणाल्या, सीसीटीव्ही यंत्रणा खरेदीचा निर्णय मागील कार्यकाळात झाला. तर त्याचे बील आमच्या कार्यकाळात दिले गेले आहे. आम्ही सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ग्राम विकास अधिकार्यांनी ते बील मंजुर करुन घेतले. त्याबाबत आम्हा महिला सदस्यांशी कोणत्याही प्रकारची किंचितशी चर्चा त्यांनी केली नाही. मासिक सभेतही या व्यवहाराची आम्हाला माहिती दिली नाही. नंतरच्या काळात जागरुक नागरिकांनी जेव्हा या गैरव्यवहाराला वाचा फोडली तेव्हाही आम्हाला या विषयापासून अनभिज्ञ ठेवण्यात आले. त्यामुळे या विषयाशी आम्हा कोणत्याही महिला सदस्याचा दूरान्वयेही संबंध नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी.

महिन्याच्या सदस्यांच्या सभेतही महिलांना सर्व विषयांची अथवा, व्यवहारांची सविस्तर माहिती देण्यात येत नाही. सभेत महिलांना मागील खुर्च्यांवर बसवले जाते तिथे पुढे काय चालले याचाही आवाज नीटपणे ऐकू येत नाही. याबाबतही वारंवार स्पीकरची सोय करण्याची मागणी केली. मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नाही. यापुढील काळात सर्व महिला सदस्यांना विश्वासात घ्यावे, आम्हीही जनतेतूनच निवडून आलो असल्याने मासिक सभेच्या बैठक व्यवस्थेत सन्मानाचे, बरोबरीचे स्थान द्यावे, सीसीटीव्ही यंत्रणा गैरव्यवहारातील रक्कम दंडासहीत वसुल करावी यासाठी आपण आग्रही आहोत, असेही महिला सदस्यांनी सांगितले. यावेळी सदस्या सौ. दिपाली भोसले, सौ. प्राजक्ता जाधव, सौ. रुपाली खरे, सौ. नीशा भोसले, सौ. विद्या कुचेकर, सौ. विमल जाधव अशा दोन्ही गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
स्टोअर रुमची पाहणीनंतर नाराजी
5 लाखांच्या सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी गैरव्यवहार चौकशीत सुमारे 2 लाखांचे साहित्यच वापरले नसल्याचे उघड झाल्याने खळबख उडाली होती. याबाबत चौकशी झाल्यानंतर, चौकशीत गोलमाल उघड झाल्यानंतर आणि त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर झाल्यानंतर गुपचूपपणे ते साहित्य शिलकीत दाखवण्यासाठी सर्व पदाधिकार्यांच्या परस्पर स्टोअर रुममध्ये आणून ठेवण्यात आले. याची माहिती मिळताच सर्व माहिला सदस्यांनी स्टोअर रुमची पाहणी करुन या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. वरातीमागून घोडे नाचवल्याच्या या प्रकाराबाबत सरपंच विजय वेळे यांनीही आपणास या काही माहिती नसल्याचे सांगितले. ते साहित्य ज्यांनी कोणी आणून टाकले त्यांची चौकशी करुन ते परत नेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!