
भिलार गणात ‘काटे की टक्कर’! शिंदे गटाच्या पूनम गोळेंच्या उमेदवारीने प्रस्थापितांची झोप उडाली
कुडाळ | प्रतिनिधी वसीम शेख
भिलार गणात आता निवडणूक नव्हे, तर थेट काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे गटातून शिवसेनेच्या पूनम निलेश गोळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून दिग्गज नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
तळागाळातील लोकांशी थेट नाळ जोडलेले, निर्भीड, डॅशिंग आणि कामातून ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणून पूनम गोळे यांची संपूर्ण तालुक्यात वेगळीच छाप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने करत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटणीवर आणले.
याच समाजकारणाची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “ही उमेदवारी पूनम गोळेंची नसून प्रत्येक शिवसैनिकाची आहे,” अशा भावनेतून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे.
एकीकडे स्थानिक आमदार मकरंद आबा पाटील यांचा उमेदवार, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या डॅशिंग आणि दमदार पूनम ताई गोळे—या लढतीमुळे भिलार गणातील राजकारण तापले आहे. अभ्यासू, सुशिक्षित आणि युवा चेहरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पूनम गोळे भागाचा चेहरामोहरा बदलू शकतात, असा विश्वास कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
आता भिलार गणात जनता कोणाच्या पाठीशी उभी राहणार?
हे येणारा काळच ठरवणार आहे.



